नांदेड | आधुनिक मराठी साहित्य, समाज व संस्कृतीच्या जडणघडणीवर सत्यशोधक चळवळीचा मोठा प्रभाव पडला आहे. मानवी स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा, बुध्दिवाद, सामाजिकता व परिवर्तनशीलता यांचे नवे भान सत्यशोधक चळवळीने दिले. सत्यशोधकीय तत्त्वविचारांमधून आत्मभान आलेल्या सजग व संवेदनशील सत्यशोधकांनी रचनात्मक सामाजिक कार्याबरोबरच साहित्यनिर्मिती केली. आज देशाला म. फुले यांच्या सत्यशोधक विचारांची गरज आहे. या विचारांचा वारसा पुढे नेण्याचीही गरज आहे असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाङमय व संस्कृती संकुलाचे संचालक प्रो. डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले. ते वर्षभर चाललेल्या व्याख्यानमालेच्या समारोपीय व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, ओबीसी चळवळीचे अभ्यासक प्रा. डॉ. रमेश शिंदे, लसाकमचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजय मोरे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे आदींची उपस्थिती होती.
येथील भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या औचित्याने दरमहा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शिवाजी नगरच्या हाॅटेल विसावा पॅलेस, काॅन्फरन्स हाॅल मध्ये या व्याख्यानमालेचे समारोपीय सत्र डॉ. दिलीप चव्हाण आणि डॉ. रमेश शिंदे यांनी ‘सत्यशोधक समाज : सर्वांगीण लोकशाहीचा वारसा’ या विषयावर गुंफले. पुढे बोलताना डॉ. चव्हाण म्हणाले की, कोणत्याही संघटनेची स्वजातीय धर्मादाय कृती ही सत्यशोधक असू शकत नाही. कुटुंबव्यवस्था जात आणि धार्मिक व्यवस्थेचे पुनरुत्पादन करते. जातीअंताशिवाय सत्यशोधक वारसा पुढे नेता येणार नाही असे ठाम मत त्यांनी मांडले. यावेळी बोलतांना डॉ. शिंदे म्हणाले की, सत्यशोधक समाज म्हणजे लोकसत्तात्मक समाज होय. या माध्यमातून म. फुले यांनी लोकशाही सिद्धांताची मांडणी केली. लोकशाही एक नैतिक संकल्पना असून फुल्यांच्या विचारातच लोकशाहीची सारसूत्रे आहेत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संगिता राऊत यांनी ज्योती वंदना गाऊन फुले दांपत्यांना अभिवादन केले. दरम्यान, गुणवंत विद्यार्थीनी ऋतुजा शिंदे, ऋतुजा मुखेडकर, कवयित्री रुपाली वागरे वैद्य, गझलकार चंद्रकांत कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अभिराज बिरपुरे यांचे भारतीय पिछडा शोषित संघटनेत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. श्रीमंत राऊत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिलीप काठोडे यांनी केले तर आभार प्रज्ञाधर ढवळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सतिशचंद्र शिदे, राजेश चिटकुलवार, लक्ष्मणराव लिंगापुरे, बाबुराव कापसे, व्ही. एन. वंगावार, महाजन सुर्यवंशी, बालाजी थोटवे, लक्ष्मण क्षीरसागर, नागोराव डोंगरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील विचारवंत प्रेक्षक, अभ्यासक, निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
तिसऱ्या मागासवर्गीय आयोगाची आवश्यकता
आरक्षणावरून जाती जातींमध्ये ध्रुवीकरणाचा घाट घातला जात आहे. दोन समाज किंवा दोन जाती यामुळे एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. खाजगीकरणाने आधीच आरक्षण प्रणालीचे नुकसान झाले आहे. खऱ्या अर्थाने त्याचे मोजमाप झाले पाहिजे. याकडे गांभीर्याने कुणी पहात नाही. कोणतेही राजकीय नेतृत्व किंवा पक्ष आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. सद्या प्रश्न फक्त धुमसत ठेवण्याचे कारस्थान सुरू आहे. आपण आपले प्रश्न संविधानिक मार्गानेच सोडवू शकतो. यासाठी आजच्या चळवळींनी तिसऱ्या मागासवर्गीय आयोगाची आवश्यकता असल्याची मागणी करायला हवी असा सल्ला डॉ. दिलीप चव्हाण यांनी दिला.