नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला नांदेड शहर व नांदेड ग्रामीण भागात भरपूर प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन अर्ज ऐवजी ऑफलाइन अर्जाकडे नागरिकांचा कल असून आलेले सर्व अर्ज तालुकास्तरीय समिती पुढे छाननीला जाण्यापूर्वी वर्गीकृत करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संपूर्ण यंत्रणेला दिले आहे.
नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी आज घेतलेल्या संयुक्त बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल व जिल्हा परिषद यंत्रणेला या संदर्भात छाननी करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय छाननी समित्या गठीत होत आहेत. एकदा समित्यांची काम सुरू झाले की त्यांच्यापुढे जाताना आधीच अर्ज वर्गीकृत असले पाहिजेत. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा हे अंतिम ध्येय आहे. त्यामुळे आलेला प्रत्येक अर्ज परिपूर्ण असेल यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करण्याचे निर्देश आज त्यांनी दिले.
ऑपरेटर, कोतवाल सर्वांनी मदत करा
ऑफलाईन अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे ते ऑनलाईन करण्यासाठी मोठी मेहनत लागणार आहे.उपलब्ध मनुष्यबळामध्ये हे काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. p तथापि, या कामासाठी तांत्रिक ज्ञान बाळगणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अन्य योजनांसाठी अनेक ठिकाणी ऑपरेटर घेण्यात आले आहेत. काही ठिकाणचे कोतवाल तंत्रस्नेही आहेत. त्या सर्वांना या कामाचे वाटप करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.
तहसीलदारांनी नियंत्रण ठेवावे
तालुकास्तरीय समितीमध्ये तहसीलदार हे सदस्य सचिव आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे अंमलबजावणीची संपूर्ण अर्जाची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे अधिनस्त सर्व यंत्रणेवर तहसीलदाराने लक्ष ठेवावे. तसेच पात्र अपात्र व त्रुटीचे अर्ज, अशी विभागणी करावी, तालुकास्तरीय समितीचे काम सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे,अशी जबाबदारी आज तहसीलदारांना सोपविण्यात आली आहे.
प्रोत्साहन भत्ता दिला जाणार
31 ऑगस्ट ही शेवटची तारीख असली तरी पुढील काही दिवसातच सर्व पात्र उमेदवारांचे अर्ज भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने नव्या आदेशानुसार नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका, समूह संघटक,मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र ,अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्याची नोंद झाल्यावर पन्नास रुपये अर्ज प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, याचीही नोंद घेण्याचे स्पष्ट केले आहे.
फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा
आपल्या परिवारातील भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळणारी, त्यांना स्वावलंबन देणारी ही योजना आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थ्याचा अर्ज भरून घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र तरीही काही असामाजिक प्रवृत्ती काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी किंवा पात्रता मिळून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करत असल्याचे लक्षात आले आहे. अशा व्यक्तींवर पोलिसांनी नजर ठेवावी, असे निर्देश दिले असून कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.