नांदेड। दिनांक 29 जून अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील गणित व संख्याशास्त्र विभागात प्रोफेसर पी.सी. महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस साजरा करण्यात आला. प्रोफेसर पी.सी. महालनोबिस यांच्या संख्याशास्त्र विषयातील भरीव योगदानामुळे त्यांना भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
महाविद्यालयात संख्याशास्त्र विभाग व नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन (NSSO) नांदेड विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस साजरा करण्यात आला. या मागचा मूळ उद्देश हा होता की, जनसामान्यांमध्ये संख्याशास्त्राचे महत्त्व पटवून देणे, विद्यार्थ्यांमध्ये विषयाची रुची वाढविणे व विषयाची व्याप्ती पटवून देणे, तसेच सामाजिक व आर्थिक नियोजनामध्ये संख्याशास्त्र विषयाचे महत्त्व अधोरेखित करणे हा होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सौ. कल्पना कदम मॅडम यांची उपस्थिती होती, आपल्या भाषणात बोलत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना गणित व संख्याशास्त्र विषयाचे महत्त्व अत्यंत सोप्या पद्धतीने विषद केले.
तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पदार्थ विज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मनीष देशपांडे यांनी प्रोफेसर पी.सी. महालनोबिस यांचे संख्याशास्त्र विषयातील योगदान व संख्याशास्त्र विषयातील विविध संधी यावर सविस्तर दृष्टिक्षेप टाकला. याप्रसंगी नॅशनल सँपल सर्वे ऑर्गनायझेशनचे (NSSO) वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी अभिजीत हालदार व राम नरेश यांनी विद्यार्थ्यांना संख्याशास्त्राचे महत्व व दैनंदिन जीवनातील उपयोग यावर सविस्तर मार्गदर्शन दिले. तसेच नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन (NSSO) यांच्यातर्फे विद्यार्थ्यांमध्ये संख्याशास्त्राची गोडी निर्माण व्हावी याकरिता विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व मोठ्या प्रमाणात बक्षीसे मिळवली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन ची सर्व टीम यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन संख्याशास्त्र विभाग प्रमुख तथा एन.सी.सी अधिकारी लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन गणित विभाग प्रमुख डॉ. सौ आशा मेश्राम यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. विजयकुमार मठपती, प्राध्यापिका सौ. धनश्री देशपांडे, वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी राम नरेश,धिरज कुमार, धर्मेंद्र कुमार व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी होते. तसेच बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.