नांदेड| नांदेड शहरात उन्हाळ्यात होणारी पाणी टँचाई व पावसाळ्यामध्ये साचून राहत असलेले पाणी या दोन्ही समस्यांवर उपाय म्हणुन महानगरपालिकेने या पावसाळ्यात शहरातील विविध ठिकाणी एकुण २३ भुजलधारा / जलपुनर्भरण (Rain Water Harvesting) प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाची सुरुवात म्हणून दिनांक ०६.०८.२०२४ रोजी स्टेडीयम परीसरातील डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे तयार केलेल्या भुजलधारा प्रकल्पाचे उदघाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी यावर्षी पर्यावरण संवर्धनासाठी नांदेड शहरात हरित नांदेड ही विशेष मोहिम हाती घेतली असुन या उपक्रमात विविध सामाजिक संस्था व नांदेडकरांची त्यांना साथ मिळत आहे. या पासाळ्यात एकूण ३० सामाजिक संस्था व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने जवळपास २५ हजार झाडांची लागवड करुन त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. त्याचपार्श्वभुमीवर एक पाऊल पुढे टाकत मनपा आयुक्तांनी नांदेड शहरात भुजलधारा प्रकल्प राबविण्याचा संकल्प केला आहे. भुजलधारा हे एका प्रकारचे रिचार्जशॉफ्टच असून या प्रकल्पाच्या माध्यमातुन भुजलाचे कृत्रिमरित्या पुर्नभरण होणार आहे.
या प्रकल्पात मोकळ्या जागेत पाणी साठणाऱ्या अथवा वाहणाऱ्या ठिकाणी साधारणपणे ८० ते १०० फूट खोलीचे विंधन छिद्र (बोअर) घेण्यात येतो. विंधन विहीरीच्या केसिंग पाईप हा सच्छिद्र ठेवण्यात येतो व त्याचे भोवती जाळी गुंडाळण्यात येते. विंधन छिद्राभोवती खड्डा करुन त्या खड्ड्यामध्ये आरसीसीचे सच्छिद्र कडे घालण्यात येतात. यानंतर हा खड्डा फिल्टर मिडीयाने भरण्यात येतो व यावरती सच्छिद्र झाकन झाकल्या जाते. याच्या माध्यामातुन वेगाने व खोलवर भुजलाचे पुनर्भरण करणे शक्य होते. साधारणता वर्षाला एका भुजलधारा प्रकल्पातून एक ते पाच लाख लिटर पाण्याची भुजल साठ्यात वाढ होते असे जल अभ्यासक डॉ.परमेश्वर पौळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मनपा आयुक्तांनी मनोगत व्यक्त करतांना भुजल शाश्वत करण्यासाठी जलपुर्नभरण करणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी असुन प्रत्येक नागरीकांनी ही जबाबदारी स्विकारली पाहिजे तसेच निसर्गाकडुन ज्या पध्दतीने आपण लाभ घेतोय त्या पध्दतीने निसर्गाला परत सुध्दा देणे हे आपले कर्तव्य असल्याचे आयुक्तांनी प्रतिपादन केले. नांदेड शहराच्या भुजल पातळीत वाढ करण्यासाठी या उपक्रमातुन महापालिकेने पुढाकार घेतलेला असुन मनपाने याकरीता करामध्ये ५% सुट सुध्दा दिली असल्याने आता शहरातील नागरीकांनी आपल्या राहत्या घरी रेन वॉटर हार्वेस्टीग करुन घेण्याचे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले आहे. या उपक्रमा अंतर्गत पहिल्या टप्यात २३ जलपुर्नभरण प्रकल्प हाती घेण्यात येणार असून पुढील टप्यात याची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.
याप्रसंगी शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, शिवाजी बाबरे, जलअभ्यासक डॉ.परमेश्वर पौळ, उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, स्टेडीयम वावस्थापक रमेश चवरे, उपअभियंता प्रकाश कांबळे, नरेंद्र सुजलेगांवकर व पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभागातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.