नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा रंगतदार संघर्ष आणि घडामोडी कोणाच्या पथ्यावर पडतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभेसोबत नांदेड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र उर्फ बंडू चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर भाजपने अद्याप आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे येथे कुणासोबत कुणाची लढत होईल हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.
वसंतराव चव्हाण यांच्या चिरंजीव आणि त्यांचे कार्यकर्ते सहानुभूतीचा लाभ घेण्यासाठी आतुर असले तरी त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या या कृतीचा विरोध करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. जयवंतराव कदम यांच्या पत्राने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ. एस एस जाधव यांनी वसंतराव चव्हाण यांच्या चिरंजीव बंडू चव्हाण यांच्या निवडीबाबत सहानुभूतीपेक्षा कार्यप्रवण आणि विकासाभिमुख व्यक्तिमत्व जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची बाब स्पष्ट केली आहे. यातच यम आय एम पक्षाचे संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील हे नांदेड जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र रंगविण्यात आले आहे. असे असले तरी जनतेच्या पुढाकाराने खासदार झालेल्या वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव बंडू चव्हाण यांच्या विरोधात एकही तुल्यबळ उमेदवार अद्याप प्राप्त झालेला नाही. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासारखे प्रभावी उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीबाबत स्वतः पुढे येताना दिसून येत नाहीत.
राज्यसभेचे सदस्य श्री अशोक चव्हाण हे निवडणूक लढविणार अशी माहिती काहींनी सोशल मीडियावर प्रसारित केली होती. हे माहिती तथ्याला धरून नसल्याचे स्पष्ट झाले. भारतीय जनता पार्टीचा सर्वश्री अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे यांना लाभ झाला. भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत यां दोन राज्यसभा सदस्यांचा भारतीय जनता पार्टीसाठी लोकसभा निवडणुकीत कितपत उपयोग झाला? याबाबत काही माध्यमांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ही बाब लक्षात घेऊन या दोन्ही राज्यसभा सदस्यांनी आपल्या कामाची आणि पदाची गरिमा ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीतही मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत (मविआ) काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यात जागावाटपावरून संभ्रम आहे, तर भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यातही समन्वयाची कसोटी लागेल. जिल्ह्यातील नऊ विधानसभेच्या जागांवर प्रमुख राजकीय गटांमध्ये चुरशीचा लढा अपेक्षित आहे, ज्यामध्ये काँग्रेस, भाजप, शिवसेना, आणि अपक्ष आमदारांचाही प्रभाव राहणार आहे.
मतदानानंतरचे निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर होतील, जे आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकतील आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने कोणते नेतृत्व उभे राहील याचा निर्णय करतील. नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदार संघात आपला प्रभाव ठेवण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या वतीने प्रयत्न होताना दिसून येते.
किनवट विधानसभा: येथे 2019 मध्ये भाजपचे भीमराव केराम विजयी झाले होते. ते या वेळीही आपापल्या परीने प्रयत्न करताना चे चित्र दिसून येते. हदगाव: विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपला प्रभाव ठेवण्यासाठी कितपत सफल होतात हे आत्ताच व्यक्त होणे कठीण आहे भोकर: विधानसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्या कन्ये साठी संपर्क, सत्ता, संपत्ती यांच्या बळावर यश खेचून आणतील याविषयी शंका नाही.
उत्तर नांदेड: विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर (शिवसेना-शिंदे गट) ज्यांनी आपल्या कार्यातून अनेक राजकीय शत्रू निर्माण केले आहेत. मोठ्या प्रमाणात कामे केल्यानंतरही यावेळी ते निवडूनच येतील हे सांगणे मोठ्या धाडसाचे ठरेल. राजेश पावडे सारखी प्रभावी मंडळी आपल्या कार्यातून लोकांना आकर्षित करण्यात मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. दक्षिण नांदेड: काँग्रेसमध्ये मोहन हंबर्डे हे प्रभावी वाटत असले तरी भाजपकडून दिलीप कंदकुर्ते आणि शिवसेना-शिंदे गटाकडून प्रभावी उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक ही चुरशीची ठरणार आहे.
लोहा: येथे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मोठा प्रभाव आहे असे असले तरी अपक्ष श्यामसुंदर शिंदे यांनी मागील निवडणूक जिंकली होती. यावेळी प्रतापराव पाटील नाजूक नात्याची जाणीव ठेवली होती. यावेळी कोण बाजी मारेल? हे पक्षाने निवडलेल्या प्रभावी उमेदवारीवर अवलंबून असणार आहे. नायगाव: भाजपचे राजेश पवार (आठवले गटाच्या तिकिटावर ) भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक लढविली होती. यावेळी भारतीय जनता पार्टीतीलच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राजेश पवार यांच्या विरोधात असल्याचे चित्र दिसून येते. विरोधक आणि स्वतःच्या पक्षातील विरोधी मंडळी यांना शांत करणे त्यातून यश खेचून आणणे अशक्यप्राय नसले तरी मोठे कठीण दिसते.
देगलूर: विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे.काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे आमदार म्हणून कुवत तसेच क्षमतेप्रमाणे कार्य केले होते. यांची आमदारकी चालवणारा धनी दुसराच असल्यामुळे आणि तो अशोक चव्हाण यांचा समर्थक आहे. जनतेत त्यांचा प्रभाव कितपत पडतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.. माजी आमदार सुभाष साबणे यांनी वारंवार बदलून काही उपयोग झाला नाही. आता घेतलेल्या पक्षाचा झेंडा याचा मतदारसंघात फारसा प्रभाव असल्याचे दिसून येत नाही. देगलूर विधानसभा मतदारसंघात सुभाष साबणे यांच्या ख्यातीपेक्षा पक्षाची ख्याती अत्यल्प आहे. आपल्याला कोणीतरी वाली असावा म्हणून घेतलेला निर्णय जनतेला कितपत प्रसंद पडेल हे सांगणे सहज शक्य आहे. एकंदरीत त्यांचा हा निर्णय अनेकांना आवडलेला दिसून येत नाही.
मुखेड: तुषार राठोड (भाजप) ज्यांनी गोविंदराव राठोड यांच्या सहानुभूतीचा लाभ घेऊन आमदार झाले आणि नंतर चांगले काम करण्याचा प्रयत्न केला मात्र सर्वांना खूष करता येणे त्यांना जमले नाही. यातच बालाजी पाटील खतगावकर यांची राजकीय लालसा याबाबत या मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरू आहे. सध्या असे चित्र असले तरी यात दिवसागणिक बदल घडवून येण्याची शक्यता आहे.