हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य चौका चौकात दुर्गंधीमुळे दिवाळीच्या पर्वामध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. नगरपंचायतीच्या स्वच्छता विभाग प्रमुखाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे आजही हिमायतनगर शहरातील नागरिकांना दुर्गंधीयुक्त घाणीचा सामना करावा लागत आहे. सकाळच्या प्रहरी निघणारी काकडा आरती दिंडीतील वारकरी समप्रदायातील महिला पुरुष नागरिकांना या दुर्गंधीने हैराण करून सोडले असल्याने नगरपंचायत पेक्षा जुनी ग्रामपंचायत बरी होती अशी प्रतिक्रिया माजी सरपंच प्रतिनिधी ज्ञेनश्वर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षभरापासून हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी स्वच्छतेचा ठेका देऊन महिन्याला लाखो रुपये खर्च केले जाते आहे. दिवाळीपूर्व शहरातील स्वच्छता ठेवणे नगरपंचाईतीच्या स्वच्छता विभागाचे कर्तव्य असताना मुख्य रस्ते सोडले तर जिकडे तिकडे गल्ली बोलत घाणीचे साम्राज्य दिसून आले आहे. शहरातील वार्ड क्रमांक १२, ११, १, २, १३, १६, १५, ७, यासह सर्वच प्रभागांमध्ये दिवाळीच्या पर्व काळात मुख्य चौकात व रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे, घाणीचे रामराज्य व नाल्यातील घाण पाणी थेट रस्त्यावर आल्याचे दिसून आले आहे. प्लास्टिक बंदीचे नियम तर नगरपंचायतीने बासनात गुंडाळून ठेवल्याने जिकडे पाहावे तिकडे प्लास्टिक दिसून येत आहेत. याचं प्लास्टिकसह, दुर्गंधीयुक्त घाण असलेल्या ठिकाणी वराहांची गर्दी, मोकाट जनावरे ताव मारताना दिसून येत आहेत.
नगरपंचायत प्रशासनाकडून शहराच्या स्वच्छतेसाठी महिन्याला लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र शहराची स्वच्छता होत नसल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीयुक्त वातावरण आणि नाल्याच्या घाण पाण्यातून रस्ते पार करावे लागले आहे. सण उत्सवाच्या पर्वकाळात देखील नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या नाकर्तेपणामुळे शहरातील चौकाचौकात अस्वच्छतेचा कळस गाठल्या गेल्याचे दिसून आले आहे. शहरातील मुख्य सराफा लाईनमध्ये तर नाल्याचे घाण पाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना साथीच्या रोगाचा सामना करण्याची वेळ आली आहे. बाजारपेठेत सणानिमित्ताने खरेदीसाठी झुंबड होत असताना शहरच्या स्वच्छतेकडे प्रभारी मुख्याधिकारी यांचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांत नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या कारभाराबाबत नियमानुसार कर भरणाऱ्या नागरीकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत वार्ड क्रमांक 12 मधील माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या नाकर्तेपणाचा पाढा पत्रकारासमोर वाचला असून, नगरपंचायत प्रशासनाने यात सुधारणा केली नाही तर आगामी काळात नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात यलगार पुकारावा लागेल असा इशाराही दिला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी धोकादायक खड्डे जैसे तेच ठेवण्यात आले असून, परमेश्वर मंदिरापासून जाणाऱ्या भास्कर चिंतावार यांच्या दुकानात समोर तुटलेल्या चेंबरकडे गेल्या सहा महिन्यापासून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत त्यांनी अनेकदा नगरपंचायत प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्या, अपघात झालेले छायाचित्र पाठविले. मात्र सदर धोकादायक चेंबर बांधून संभाव्य धोका टाळण्याकडे नगरपंचायत विभागाचे बांधकाम खात्याने देखील दुर्लक्ष केले आहे.
एकूणच शहराच्या स्वच्छतेकडे स्वच्छता विभाग व बांधकाम विभागाच्या संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना किरकोळ जखमी व्हावे लागले आहे. अनेकांच्या दुचाक्या खड्ड्यामध्ये पडल्यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणाची पोल खुलत आहे. हा प्रकार नुकतेच आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या निदर्शनास अनेकांनी आणून दिला. तर हिमायतनगर शहरात ग्रामपंचायत असताना केवळ 70 हजारांमध्ये शहराचे स्वच्छता चांगली होत होती. आज घडीला आठ ते दहा लाख रुपये महिन्याला खर्च करून शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्यामुळे जिकडे तिकडे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक प्रभागात दोन दोन महिने स्वच्छता विभागाचे कचरा उचलण्याची गाडी देखील येत नसल्याचे नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष देऊन हिमायतनगर नगरपंचायतीकडून होत असलेल्या स्वच्छतेच्या बाबतीकडे लक्ष केंद्रित करून आतापर्यंत झालेल्या कारभाराची चौकशी करावी.
ठेकेदार व स्वच्छता विभागाच्या प्रमुखाच्या दुर्लक्षामुळे दुर्गंधी आणि घाणीमुळे त्रस्त झालेल्या तसेच साथीच्या आजाराला बळी पडलेल्या नागरिकांना न्याय द्यावा. अशी मागणी दिवाळीनिमित्ताने गावात सण साजरा करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या नातेवाईकातून केली जात आहे. दिवाळी संपून गेली तरी शहरातील ठिक ठिकाणच्या चौकात घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरून अनेकांना आजाराचा सामना करावा लागतो आहे.
याबाबत माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले की, नगरपंचायत प्रशासनाचे माणसं कचरा किंवा नाल्या साफ करायला येत नाहीत. दुपारी सर्व माणसे बाहेर गेल्यानंतर घराजवळील लावलेल्या स्टिकर ला स्कॅनिंग करून घेऊन स्वच्छता केल्याचा दाखवून मोठ्या प्रमाणात बिलांची उचल करून शासनाला चुना लावत आहेत. त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे असून, महिन्याला लाखो रुपये खर्च करून जर शहराची स्वच्छता होत नसेल तर स्वच्छतेवर खर्च करून काय फायदा आहे. या बाबीला गांभीर्याने घेऊन हिमायतनगर शहराच्या स्वच्छतेचा ठेका अन्य ठेकेदाराला देऊन शहरातील नागरिकांना सुरक्षित आरोग्याची हमी द्यावी. स्वच्छता विभागाचे खाते एखाद्या चांगल्या जबाबर व्यक्तीला देऊन महिन्याला स्वच्छतेचा कर भरणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भामध्ये स्वच्छता विभागाचे भालेराव यांच्याशी संपर्क करण्यासाठी दोन-तीन वेळा दूरध्वनीवर प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन उचलला नसल्यामुळे हिमायतनगर शहरात नागरिकांना होत असलेल्या घाणीचा आणि दुर्गंधीच्या त्रासाचा सामना करावा लागतो हे मात्र खरे.