हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरच्या विकासासाठी अंदाजे 150 कोटीहून जास्तीचा निधी खर्च झाला. मात्र आजही हिमायतनगर शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अर्धवट नळयोजनेच्या कामांसह, शहरातून गेलेल्या अर्धवट राष्ट्रीय महामार्ग कामात अभियंता, ठेकदाराकडून झालेली हेराफेरी, राजकीय नेत्यांच्या टक्केवारीच्या हिस्सेदारीमुळे विकास कामात बोगसपणा आल्याने हिमायतनगर शहराचा सत्यानाश झाला आहे. अशी संतापजनक भावना रविवारी दुपारी झालेल्या पावसाच्या पाण्याने तासनतास मुख्य प्रवेश रस्ते बंदच्या त्रासाला वैतागलेल्या विकास प्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे. जनतेच्या विकासाच्या नावाखाली स्वतःच्या विकास करून घेणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या परिवर्तनाच्या लाटेतून दाखवून देण्याची भाषा देखील अनेकांनी बोलून दाखविली आहे.
हिमायतनगर ग्रामपंचायतीला मागील नऊ वर्षांपूर्वी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला नगरपंचायत झाल्याने शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा मिळतील अशी रास्त अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फेल ठरली असल्याचे जनतेला होत असलेल्या हालअपेष्ठावरून दिसून येत आहे. रविवारी दुपारी दोन तासात झालेल्या मुसळधार पावसाने शहरात जिकडे तिकडे पाण्याचे तळे साचल्याने चित्र दिसून आले आहे. विशेषतः शहरांमध्ये प्रवेश करणारी मुख्य श्री परमेश्वर मंदिराच्या कामाने जवळ गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी साचून राहिल्याने जवळपास तासभर वाहनांचा रस्ता बंद झाला होता. पाण्याचा प्रवाह चालू असताना अनेकांना जीवघेणा पद्धतीने वाहने चालवून घर गाठावे लागले आहे. कमानीच्या आजूबाजूला असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानातील सामानाची नासधूस होऊन मोठ्या नुकसानीचा भुर्दंड व्यापारी वर्गांना सहन करावा लागला आहे.
विदर्भात प्रवेश करणारा शहराजवळील नडव्याच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहू लागल्याने दोन तास पैलतीरावर वाहनधारक, शेतकरी,नागरिकांना अडकून राहावे लागले. या नडव्याच्या पुलाला मंजुरी मिळाली असल्याचे दरवर्षी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणाऱ्या राजकीय नेत्यांनी शहरवासीयांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचे काम केले आहे. अल्पसा पाऊस झाला तरी येथील नाल्यावरून पुराचे पाणी जाऊन मार्ग बंद पडण्याच्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. यंदा पावसाळा ते परतीच्या पावसापर्यंत अनेक वेळा शहरातील चौपाटी सराफ लाईन, बजरंग चौक, आंबेडकर चौक, पोलीस ठाण्याजवळील बोरगडी चौक, सिरंजनी रस्ता चौक, नडव्याचा पूल, परमेश्वर मंदिराची मुख्य प्रवेश कमान, आणि शहरातील विविध वॉर्डात पाणीच पाणी जमा होऊन अनेकांच्या घरात शीरल्याने शहराच्या दयनीय अवस्थेचे चित्र उघडपणे दिसून आले आहे.
एव्हडेच नाहीतर हिमायतनगर शहरातून झालेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम ठेकेदाराने अंदाज पत्रकाप्रमाणे केले नाहीत. रस्त्याची रुंदी कमी केली, पुलाच्या कामात मनमानी केल्याने सांडपाणी जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या नाल्याचे बांधकाम अर्धवट ठेऊन मंजूर झालेल्या उड्डाणपूल देखील केला नाही. यासाठी राजकीय नेत्यांनी आपल्या काही हस्तकांना खुश करण्यासाठी रद्द करण्याचा ठराव वरिष्ठ स्थरावर पाठविला. परिणामी वाहणाऱ्या पावसाच्या व नाल्याचे पाणी जाण्याची वाट थांबली असून, पाऊस होताच मुख्य रस्त्यावर थेट पाणी येऊन रस्ते बंद होत आहेत. रविवारी झालेल्या धुंवाधार पावसाच्या पाण्याने तळे साचून तासभर रस्ता बंद झाला होता.
शहराच्या विकासकामामध्ये झालेली हेराफ़ेरी, राष्ट्रीय महामार्ग कामात संबंधित अभियंता, ठेकेदार व टक्केवारीत हिस्सा घेतलेल्या राजकीय नेत्यांच्या मनमानी कारभाराबाबत अनेकांनी संतापजनक भावना व्यक्त केली आहे. किमान शहरातील सांडपाणी व पुराच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराने दोन्ही बाजूने नाल्याचे काम तात्काळ करून शहरात उड्डाणपूल करून द्यावा. बोरी रस्त्यावरील नडव्याच्या पुलाचे काम करावे. जेणेकरून वारंवार पाऊस होताच बंद पडणारा शहरातील मार्ग सुरळीत होईल अशी रास्त अपेक्षाही विकास प्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्यावी
रविवारी झालेल्या दोन तासाच्या मुसळधार पावसामुळे शेतातील सोयाबीनसह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतील वाचलेले सोयाबीनचे पीक काढून घरी आणण्यासाठी प्रयत्न चालविला होता. मात्र अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे कापून ठेवलेले रानातील सोयाबीन भिजून गेले तर अनेक शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबीनचे ढिगारे भिजून सोयाबीनला कोंब फुटून नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. ही बाब लक्षात घेता पावसाळ्यात झालेले अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने दिलेल्या धुंवाधार पावसाचा दणका या दोन्हीच्या नुकसानीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.