नांदेड| ‘ज्या घरात बाई नसते त्या घराला कडीकोंडा लागतो. बाई हे घराचे शहाणपण असते. बाईशिवाय घराला घरपण नसते. खेड्यातील स्त्रीच्या वाट्याला खूप कष्टाचे जगणे येते. परंतु त्याविषयी तक्रार करण्याचे स्वातंत्र्य नसते. मी सुध्दा खेड्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली आहे. माझ्या सारखी बंडखोर स्त्री जेव्हा याबाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न करते तेव्हा समाज तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. बाईच्या जगण्यातील घालमेल अचूकपणे टिपणारी कविता माझ्या मातीतील श्रीनिवास मस्के हा कवी करतो याचा मला खूप अभिमान आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.
नांदेड येथील नियोजन भवनात आयोजित प्रसिध्द कवी श्रीनिवास मस्के यांच्या ‘बाईपणाचा दस्तऐवज’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत त्या बोलत होत्या. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रकाशक बाळासाहेब घोंगडे, सुधाकर आडे, सुचिता खल्लाळ, देवीदास फुलारी, डॉ. जगदीश कदम, डॉ. नागनाथ पाटील, शंकर वाडेवाले, अनुश्री मस्के यांची उपस्थिती होती. आरंभी शाल, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कवी श्रीकांत देशमुख यांनी ‘बाईचा दस्तऐवज’ या कविता संग्रहावर भाष्य करताना स्त्रीचे दुःख किती आदिम आहे हे सांगून या कवितेचा धागा त्याच्याशी कसा जुळतो हे स्पष्ट केले. कविता ही अत्यंत जबाबदारीने लिहिण्याची गोष्ट असून तुकोबांची कविता ही जगातील सर्वश्रेष्ठ कविता आहे, असे सांगितले.
सुचिता खल्लाळ यांनी मस्के यांची कविता स्त्रीजगण्यातील काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करते. त्या प्रश्नांची उत्तरे आपण गंभीरपणे शोधली पाहिजेत, असे मत व्यक्त केले. ‘कवितेत चाल, लयी पेक्षा आशय महत्वाचा असतो. ‘हा संग्रह हदगाव कडील बोलीभाषेतील अनेक नवीन शब्द मराठी साहित्याला देणारा आहे, असे प्रतिपादन देवीदास फुलारी यांनी केले. पुणे येथील अक्षरवाङ्मय प्रकाशनाचे संचालक बाळासाहेब घोंगडे यांनी श्रीनिवास मस्के यांचा कवितासंग्रह गुणवत्तेच्या निकषावर प्रकाशित केल्याचे सांगितले.
या प्रकाशन सोहळ्यात डॉ. जगदीश कदम, डॉ नागनाथ पाटील, शंकर वाडेवाले या कवीच्या शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या मनोगतातून कवीला शुभेच्छा दिल्या. चार तास चाललेल्या या कार्यक्रमाचे राम तरटे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. शिवा आंबुलगेकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास रविचंद्र हडसनकर, प्रा. यशपाल भिंगे, विलास वैद्य, पी. विठ्ठल, डॉ भगवान अंजनीकर, अनिल काळबांडे, सुरेश जोंधळे, महेश मोरे, श्रीराम गव्हाणे, रोहिणी पांडे, अनिता दाणे, स्वाती कान्हेगावकर, स्वाती भद्रे, मेघा पाठक, अंजली मुनेश्वर, लक्ष्मण मलगीरवार, पांडुरंग पुट्टेवाड, व्यकंटेश चौधरी, अमृत तेलंग, आत्माराम राजेगोरे, डॉ कमलाकर चव्हाण, विजय चव्हाण, जगन शेळके, सदानंद सपकाळे, साईनाथ रहाटकर, चंद्रकांत चव्हाण, प्राचार्य राम जाधव, सुरेश वगेवार, चंद्रकांत राऊत, बाळू दुगडुमवार, अॅड. विजयकुमार भोपी, साहित्य व शिक्षणक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.