अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. – संपादक
आजपर्यंत २४ वर्षात भाऊ ट्रॅव्हल्स तसेच माय हॉलिडेज तर्फे यशस्वी अशा पद्धतीच्या खूप अवघड अशा धार्मिक यात्रा पार पाडलेल्या आहेत. चारधाम यात्रा असोत अथवा अमरनाथ सारख्या अति अवघड व दुर्गम अशा यात्रा यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. हजारो यात्रेकरूनी त्याचा मनमुराद लाभ घेतला. एकही धार्मिक ठिकाण नसलेले व फक्त प्रेक्षणीय स्थळांचा समावेश असलेला पहिलाच टूर चे आयोजन आम्ही केले ते म्हणजे अंदमानचे. या टूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी आमचा सर्व प्रवास मुख्यतः रेल्वे द्वारे व्हायचा. काही प्रवासी विमानाने देखील यायचे. परंतु सर्व प्रवासी विमानाने नेण्याची ही पहिलीच वेळ. नांदेड ते हैदराबाद हा रेल्वेचा प्रवास केल्यानंतर आमचा पुढचा प्रवास विमानाने होणार असल्यामुळे विमानाची तिकिटे काढताना विशाल मुळे यांनी योग्य ती दक्षता घेतलेली होती. काही दिवसापूर्वी हॉटेल ग्रँड सेंट्रल पार्क येथे झालेल्या गेट-टुगेदर मध्ये सर्व टुरिस्ट चा परिचय झाला होता. जवळपास नव्वद टक्के टुरिस्ट हे यापूर्वी आमच्या कोणत्या ना कोणत्या टूरमध्ये सहभागी झालेले होते. त्यांनी आमच्यासोबत आलेले अनुभव हे अविस्मरणीय होते असे सांगितल्यामुळे नवीन टूरिस्टना वाटत असलेली काळजी क्षणात दूर झाली. यावेळी अनेकांनी कराओके सोबत घ्या अशी प्रेमळ मागणी केल्यामुळे नवीन कराओके ची कालच खरेदी केली.
२५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान अंदमान निकोबार ची टूर जाणार आहे. विशेष म्हणजे या टूर ची घोषणा सोशल मीडियावर केल्यानंतर अवघ्या दोन दिवसात आमचा कोटा पूर्ण झाला. जागे अभावी कित्येकांना विनम्रपणे नकार द्यावा लागला. अंदमानच्या या ग्रुपमध्ये ५८ टुरिस्ट व आम्ही तीन टूर मॅनेजर अशा ६१ जणांचा समावेश आहे. त्यामध्ये लता व शामसुंदर कदम,यशोदा व उद्धव चौधरी,उमा व विजय कुलकर्णी,प्रा.अंजली व प्रकाश सिंगेवार,कल्पना व प्रा.राम जाधव,ॲड.विजया व तुकाराम इंद्राळे,सुरेखा व रमाकांत भुरे,प्रभा व नागोराव देव,रत्नमाला व रमेश बुलबुले,स्मिता व शिवाजी देशपांडे,सुरेखा व सुभाष भिसे,अनिता व सुधीर देशपांडे,उषा व उत्तम पांचाळ,उज्वला व रमेश केंद्रे,विद्या व व्यंकट नोमुलवार,सुषमा व रमेश जयकर,सायली व सुधीर देशपांडे, मैथिली व मुकुंद पांडे,मंजुषा व राजू मोतेवार,वसुंधरा व प्रकाश लालपोतू ,शारदा व अनिल कठाळे,शोभा व बालाजी कोटलवार,उषा व नारायणराव गेनवाड,आशा व प्रकाश चेके या जोडप्यांचा सहभाग आहे. मेघदे परिवारातील ॲड.उमेश व स्वाती ही जोडी तसेच रोहन हा त्यांचा मुलगा येणार आहे.मंजू व श्रीकांत चौधरी यांच्यासोबत त्यांची सहा वर्षाची मुलगी मनुश्री ही देखील येणार आहे. याशिवाय प्रा.लक्ष्मी पुदरोड,सविता क्यातमवार, अश्विनी व ॲड.दामिनी डहाळे हा महिलांचा ग्रुप देखील सोबत असणार आहे. संदीप माईंड, जयवंत वाणी व मी व्यवस्थेसाठी या ग्रुप सोबत टूर मॅनेजर म्हणून राहणार आहोत.
अंदमान म्हटले की आम्हा महाराष्ट्रीयन लोकांच्या समोर सर्वात उभे राहते ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भोगलेले काळे पाणी. याशिवाय बेटावर असलेले नयन मनोहर समुद्रकिनारे. मी पहिल्यांदाच अंदमान ला जात असल्यामुळे खूप एक्साईट झालो होतो. स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे आराध्य दैवत. त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाची जाणीव अनेक भारतीयांना नाही. त्यामुळे प्रत्येकाने अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट दिली पाहिजे. तिथे राजकीय कैद्यांना जाणीवपूर्वक देण्यात आलेल्या यातना प्रत्यक्ष जाऊन पाहिल्या पाहिजे. त्याशिवाय सावरकर व इतर क्रांतिकारकांचे योगदान लक्षात येणार नाही. मला खात्री आहे की, अंदमान पाहिलेला कोणताही व्यक्ती सावरकरांना कदापिही विसरू शकणार नाही.
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह हा ५७१ बेटे समाविष्ट असलेला एक भारतीय केंद्रशासित प्रदेश आहे. भारताच्या आग्नेय दिशेला ही बेटे आहेत. अंदमान बेटावरील श्री विजयपुरम पूर्वीचे पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे.अंदमान-निकोबारमध्ये उत्तर आणि मध्य अंदमान, दक्षिण अंदमान,निकोबार असे तीन जिल्हे आहेत. निकोबारी व बंगाली येथील प्रमुख भाषा आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी असून लोकसंख्या ३,७९,९४४ एवढी आहे. येथील साक्षरता ८६.२७ टक्के आहे. तांदूळ, चिकू व अननस ही येथील प्रमुख पिके आहेत. तसेच येथे दगडी कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.
‘अंदमान’ हे नाव रामायणातील ‘हनुमान’ या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. (हनुमान – हन्दुमान – अन्दुमान -अंदमान).दुसऱ्या मतानुसार अंदमान हे नाव तेथील ग्रेट अंदमानी या तेथील मूलनिवासी जमाती जमातीवरून पडलेले आहे.‘निकोबार’चे मूळ तमिळ नाव नक्कवरम म्हणजे म्हणजे नग्न लोकांचा प्रदेश असे आहे. राजेंद्र चोल हा तमिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन, सुमात्रा (इंडोनेशिया)च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारी तळ स्थापन केला. त्या बेटांना त्या काळी तिनमत्तिवू असे संबोधले जाई. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटांचे नाव नक्कवरम असल्याचे तंजावरच्या इ.स. १०५० च्या शिलालेखांवरूनही स्पष्ट होते. अंदमान- निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत. सावरकरांनी त्यांच्या ‘कमला’ काव्याची निर्मिती या ठिकाणच्या सेल्युलर जेलमध्ये केली. कोणतेही लेखन साहित्य नसताना ही निर्मिती केली गेली होती.अंदमान टूरची प्रत्यक्ष सुरुवात बुधवारी होणार आहे.या टूरचा दररोजचा वृत्तांत “अंदमान च्या बेटावरून ” या सदराखाली प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे आपण सर्व भाग आवर्जून वाचावे ही विनंती. (क्रमश:)