श्रीक्षेत्र माहूर। माहुर येथील तालुका क्रीडा संकुलासाठी शासनाने ४ कोटी ९९ लक्ष रुपये मंजूर केले आहे. किनवट /माहूर विधानसभा मतदार संघाचे कार्यकुशल आ.भिमराव केराम यांच्या प्रयत्नांचे मोठे फलित असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लवकरच क्रीडा संकुलाचा मुहूर्त साधला जाईल अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे यांनी दिली आहे.
माहुर तालुक्यात विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची वाढती संख्या, सोई,सुविधा,साधने, मैदान, अनुभवी प्रशिक्षक आदी बाबींचा अभाव व अनेक स्पर्धेतून क्रीडा क्षेत्रात माहुर तालुक्याचे नाव मोठे करणाऱ्या खेळाडूंची गरज लक्षात घेऊन आ.भिमराव केराम यांनी क्रीडांगण आणि क्रीडा संकुलासाठी अविरतपणे पाठपुरावा केला होता. पांडवलेणी जवळील २-५० एकर शासकीय जागेत सदर क्रीडा संकुल उभारले जाणार आहे.क्रीडा संकुलाचा मार्ग प्रशस्त करून दिल्याबद्दल नगरसेवक सागर महामुने,अनिल वाघमारे यांचेसह क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी आ.केराम यांचे आभार मानले आहे.
क्रीडा संकुलात अंतर्गत व बाह्य क्रीडांगणांचा समावेश असून बॅटमिंटन हॉल, बास्केट बॉल, जिमनॅस्टिक, ज्यूडो,कराटे, पॉवर लिफ्टींगसह २०० मिटरचा ट्रॅक आदी सुविधा उपलब्ध असेल.अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी जयकुमार टेंभरे यांनी दिली.