पुणे| महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित करण्यात येत असलेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याचे क्रीडा वैभव आणि क्रीडा क्षेत्रातील ओळख देशपातळीवर पोहोचविण्याची संधी आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.
विधानभवन येथे महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धा आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, उपायुक्त नयना बोदार्डे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, माहिती उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर उपस्थित होते.
श्री.राव म्हणाले की, महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन पुण्यासाठी गौरवाची बाब आहे. दोन दशकानंतर असे आयोजन पुण्यात होत आहे. यासोबत जी-२० बैठका आणि एटीपी टेनिस स्पर्धेचे देखील आयोजन नववर्षाच्या सुरुवातीला होत आहे. त्यामुळे स्पर्धा आयोजनाची चांगली तयारी करण्यासोबत पुण्याचे ब्रँडीगदेखील करण्यात यावे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्तम क्रीडा कौशल्य पाहण्याची संधी असल्याने त्यांनाही आयोजनात सहभागी करून घ्यावे.
स्पर्धेसाठी वाहतूकीचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी वाहतूक मार्शलची नेमणूक आवश्यक ठिकाणी करण्यात यावी. खेळाडूंना स्पर्धा कालावधीत आवश्यक आरोग्य सुविधा देण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात यावी. खेळाडूंची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
क्रीडा आयुक्त सुहास दिवसे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा २ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत पुणे येथे होत आहेत. या स्पर्धेत ३९ क्रीडा प्रकारांचा समावेश असून सुमारे ९ हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. राज्यात क्रीडा वातावरण निर्माण करणे, खेळाला उत्तेजना देणे, खेळाडूंना नैपुण्य दाखवण्याची संधी मिळावी हा या आयोजनामागचा उद्देश आहे. बालेवाडी येथे २५, जळगाव-४, नाशिक-२, नागपूर-४, मुंबई-२, बारामती, एमआयटी, पुणे, औरंगाबाद व पूना क्लब येथे प्रत्येकी १ याप्रमाणे महाराष्ट्रात स्पर्धांचे आयोजन होईल.
श्री. शिरगावकर म्हणाले की, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याची कामगिरी उंचावण्याच्या हेतूने महाराष्ट्र ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धांमुळे राज्यात क्रीडाक्षेत्राला अनुकूल वातावरण निर्माण होईल. या क्रीडा स्पर्धांमुळे क्रीडा क्षेत्राचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख होईल.
महाराष्ट्र ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा जिल्हा आणि राज्यासाठी महत्वाच्या असून स्पर्धांसाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी सांगितले. यावेळी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. खेळाडू आणि प्रशिक्षकांना योग्य सुविध देण्याच्यासूचना आयुक्त श्री. राव यांनी संबंधितांना दिल्या. बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.