नवीन नांदेड l सिडको परिसरातील रुबी हॉटेल या ठिकाणी 28ऑक्टोबर रोजी महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मतदान जनजागृतीच्या संदर्भात 087 नांदेड दक्षिण स्वीप कक्ष मार्फत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत असताना स्वीप कक्षातील जेष्ठ सदस्य व महिला बचत गट विषयक अभ्यासाचे तज्ञ प्रा.डाॅ. घनश्याम येळणे, संचालक सामाजिक शास्त्रे संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली या बचत गटातील महिलांनी असा निर्धार केला की, येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्या व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांसह मतदान करण्याकरिता निर्धार करीत आहेत.
याप्रसंगी बोलत असताना प्रा.डॉ येळणे असे म्हणाले की, ‘भारतासारख्या मोठ्या लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये महिलांचा राजकीय सहभाग हा मतदानाच्या माध्यमातून असणे हे आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.’ त्यांनी महिलांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून बचत गटाचे असणारे महत्त्व देखील याप्रसंगी समजावून सांगितले.
या मतदार जनजागृतीच्या कार्यक्रमात स्वीप कक्ष सदस्य प्रा. डॉ. विजय तरोडे यांनी उपस्थित महिलांना मतदानाची शपथ देऊन मतदान करण्यासाठी प्रेरित केले. या मतदार जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी महिलांचे मतदान विषयक असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देखील सोडविण्यात आली. याप्रसंगी महानगरपालिका प्रशासनामार्फत मतदान जनजागृती करिता ठेवण्यात आलेल्या स्वाक्षरी बोर्डावर सर्व महिलांनी मोठ्या उत्साहाने स्वाक्षरी अभियान राबविले व मतदान जनजागृती करिता तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर प्रत्येक महिलांनी फोटो देखील काढला.
या कार्यक्रमाप्रसंगी 087 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाचे सदस्य प्रा.डाॅ. दत्तात्रय बडुरे, अजय आठवले, त्याचप्रमाणे मनपा व्यवस्थापक,प्रवीण किशनराव मगरे, अशोक माणिकराव सूर्यवंशी, समुदाय संघटक श्री अंकुश माधवराव वाघमारे आणि जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सौ. वैष्णवी गुडेवार व सौ.अनिता नळगे तसेच बचत गटातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. सदरील महिला मतदार जनजागृती चा कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाला.