मराठवाड्याने लोकसभेच्या निवडणुकीतून भाजपला धक्काच दिला आहे. ‘भाजपचा गड’ अशी आगेकूच करणाऱ्या मराठवाड्याने भाजपचा एकही उमेदवार निवडून दिला नाही. ही परिस्थिती मराठवाड्यावर का आली? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघातून तिघे काँग्रेसचे तर अन्य तिघे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे व एक खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे व बीडचे खासदार शरद पवार यांच्या गटाचे निवडून आले.
मराठवाड्यातील मतदार नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज नाही. मराठवाड्यात त्यांच्या झालेल्या सभांना चांगल्याच प्रतिसाद होता . त्याचबरोबर अमित शाह यांनी घेतलेल्या प्रचार सभा ही चर्चेत राहिल्या. कलम ३७०, राम मंदिर , ट्रिपल तलाक या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना मराठवाड्यातील जनतेचाही पाठिंबा होता. मग असे काय घडले ज्यामुळे मराठवाड्यातून भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही? यावर चर्चा केली तेवढी कमीच ठरेल. परंतु प्रामुख्याने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर समोर येऊन बोलणे देखील तेवढेच गरजेचे आहे. मराठवाड्यातील मतदार हा निर्णय घेऊन मोकळा झाला. परंतु त्यांनी दिलेला संदेश हा सर्व राजकारण्यांची झोप उडविणाराच आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हे कारण भाजपच्या पराभवासाठी समोर केले जात असेल तर ते पूर्णपणे चुकीचे ठरेल. मराठवाड्यातून निवडून आलेले आठही खासदार मराठा समाजाचेच आहेत. ते केवळ मराठा समाजाच्या मतदानावर निवडून आलेत , असे नव्हे तर त्यांच्या विजयामागे वेगवेगळी कारणे आहेत. हे देखील लक्षात घेणे तेवढेच गरजेचे आहे. सगळ्यात खालच्या थराला असणाऱ्या मतदारांना स्वस्त धान्य दुकानातून राशन पाणी मिळाले. श्रीमंत व अति श्रीमंत लोकांनाही भाजपकडून काही ना काही मिळाले. परंतु जो मध्यमवर्गीय आहे , त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी झुंजावे लागत आहे . त्यांची ही झुंज मतपेटीतून नाराजी दाखविणारी ठरली, अशी चर्चा मराठवाड्यात होत आहे.
मराठवाड्यात भाजपाची केविलवाणी अवस्था का झाली? याचे उत्तर शोधण्यासाठी मराठवाड्यातील विविध प्रश्नांकडे तसेच भाजपच्या नेतृत्वाने केलेल्या चुकांबद्दल गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे . लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपचा एकही खासदार निवडून आलेला नाही. केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असे महत्त्वाचे पद दिलेले रावसाहेब दानवे हे गेल्या 35 वर्षांपासून सलग लोकसभेत निवडून गेले परंतु यंदा त्यांना काँग्रेसच्या उमेदवारांनी धोबीपछाड दिली. केंद्रात मंत्री राहिलेल्या नेत्याला मतदारांनी अशी शिक्षा का दिली? यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भाजप व मराठवाडा अशी जवळची समीकरणे असणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येला म्हणजेच पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे . त्यांच्या पराभवामागे कोणाचा हात आहे, हे शोधण्याऐवजी मराठवाड्यातील जनतेला काय हवे आहे? व काय हवे होते ? याचा विचार भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी कधीच केला नाही. मंत्रालय स्तरावर असलेली मराठवाड्यातील जनतेची विविध कामे ताटकळत पडलेली असतात. त्यांना कोणीही वाली नसतो. या कारणाने मराठवाड्यातील सायलेंट वोटर लोकसभेत पेटून उठला.
चार-पाच महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे या विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाडा भाजपच्या बाजूने असेल की नाही, याचे उत्तर कोणताही राजकारणी देऊ शकणार नाही. कारण मराठवाड्यातील सायलेंट वोटरने लोकसभेला दिलेल्या निकाल हा सहजासहजी दिलेला नाही. मराठवाड्यातील जनतेची कामे मुंबईच्या मंत्रालयात नेहमीच अडकून पडतात मराठवाड्यातील अधिकारी सर्वसामान्यांची कामे करत नाहीत. शेतकरी ,महिला ,बेरोजगारी याबरोबरच शिक्षण क्षेत्रात अलीकडच्या काळात मराठवाड्यातील सर्वसामान्य संस्थांवर झालेला अन्याय हा देखील भाजपच्या पराभवासाठी काही कारणांपैकी प्रमुख कारणे मानली जातात. याबरोबरच मराठवाड्याच्या नशिबाला आणून बसवलेले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील मराठवाड्यात भाजपच्या पराभवाला तेवढेच जबाबदार आहेत .
अशोक चव्हाण यांच्या विषयी असलेला संताप व ओरड मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून होत आहे. मराठा आरक्षण समितीचे महत्त्वाचे पद असताना त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही व असे असताना भाजपने त्यांना जवळ केले, हा राग देखील मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिला. एवढेच नव्हे तर ‘नांदेडचा सातबारा माझ्या नावाने आहे’ अशी दर्पोक्ती ठोकणाऱ्या अशोक चव्हाण यांना त्यांच्याच मतदारसंघातील मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे आता किमान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तरी त्यांच्या कुटुंबीयांना कुठूनही उमेदवारी देऊ नये अन्यथा भाजप स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल, अशी चर्चा नांदेड जिल्ह्यातील भोकर तसेच मुदखेड या त्यांच्या बालेकिल्ल्यातच होत आहे.
विशेष म्हणजे भाजपने राज्यसभेवर सदस्य निवडत असताना नांदेड मधील दोघांची निवड केली. या दोघांमध्ये अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. त्यांच्या बरोबरीने डॉ. अजित गोपछडे यांचीही नियुक्ती भाजपच्या दिल्ली दरबाराने केली. हे सर्व ठरवत असताना मुंबईतील भाजप नेत्यांनी घेतलेल्या निर्णय किती चुकीचा आहे, हे देखील यामधून स्पष्ट झाले आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात पूर्वीच्या खासदारांचा पराभव झाला. यामध्ये मात्र मराठवाड्यातील जनता समाधानी आहे. पुन्हा पूर्वीच्याच खासदाराला संधी भेटेल की काय? या भीतीने ही छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील मतदार चिंतेत होता.
परंतु त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे संदिपान भुमरे हे विजयी झाल्याने त्या विजयाचा आनंद मराठवाड्यातील जनतेला आहे. त्या जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव भाजप नेत्यांची झोप उडविणारा ठरला. मराठवाड्यातील धाराशिव, परभणी व हिंगोली या तिन्ही लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे. या तिन्ही ठिकाणी पूर्वी शिवसेनेचेच खासदार होते. पुन्हा या तिन्ही लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार विजयी झाले. त्या भागात असणाऱ्या मतदारांची मनधरणी करण्यात अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना यश आले नाही.
नांदेड व लातूर लोकसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध असलेली नाराजी भाजपच्या मुळावर आली. या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील पूर्वीच्याच खासदारांना यंदा उमेदवारी देण्यात आली. ही उमेदवारी जाहीर होईपर्यंत दोन्ही ठिकाणचे उमेदवार कदाचित बदलले जातील, असे चित्र दिसत होते. परंतु या दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार न बदलल्याने भाजपला पराभवाचा सामना करावा लागला, असेही बोलले जात आहे. तसे पहिले तर नांदेड लोकसभा मतदारसंघात पूर्वीचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यावर जनता समाधानी होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अशोक चव्हाण यांना पक्षात घेतल्याने मुस्लिम व दलित मतदार प्रचंड संतप्त झाला होता. त्यांचा राग त्यांनी मतदानाच्या वेळी पूर्ण उपस्थिती दर्शवून दाखवून दिला. दलित व मुस्लिम बांधवांची मतदानाची टक्केवारी खूप जास्त होती . व या दोन्ही समाजाने भाजपला कमी प्रमाणात मतदान केले . त्यामागे केवळ अशोक चव्हाण हेच कारणीभूत आहेत , अशी उघड चर्चा नांदेडमध्ये होत आहे.
मराठवाड्यात अलीकडच्या चार महिन्यात २६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अलीकडच्या काळात बी बियाणे, खत यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले ते दर नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे आहे. बी बियाणे तसेच खतासाठी केंद्र सरकारला सबसिडी देता आली तर शेतकरी वर्ग जाम खूश होऊ शकतो. गॅसचे वाढलेले दर तसेच पेट्रोल व डिझेलची महागाई हे दोन्हीही मुद्दे थेट सर्वसामान्यांना त्रास देणारे ठरले. याव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मराठवाड्यात नवीन महाविद्यालय मंजूर करत असताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केवळ भाजपेतर आमदारांच्या संस्थांनाच झुकते माप दिले . त्यांनी सर्वसामान्य व इमान इतबारे काम करणाऱ्या संस्थांना नवीन महाविद्यालय दिले नाहीत. या प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रातील उच्च दर्जाचे बुद्धिवादी मतदार भाजपवर नाराज होते.
शेतकरी व शैक्षणिक क्षेत्रातील मतदार हा कायापालट करू शकतो, हे संकेत मराठवाड्यातील मतदारांनी राजकारणी लोकांना दिले आहेत. राजकीय नेत्यांनी आता तरी सुधरावे व सर्व सामान्यांच्या कामाला झुकते माप द्यावे हाच संदेश मराठवाड्यातील मतदारांनी सबंध महाराष्ट्रातील नेत्यांना दिला आहे पक्ष कोणताही असो परंतु नेत्यांनी सर्व सामान्यांची कामे केलीच पाहिजेत अन्यथा त्यांना खुर्चीवर बसविणारा मतदार कधीही खाली खेचू शकतो हेच मराठवाड्यातील निकालाने दाखवून दिले आहे. छत्रपती संभाजी नगरचे इम्तियाज जलील यांच्या पराभवाची चर्चा मराठवाड्यातील मुस्लिम बांधवांमध्ये होत आहे. तशीच चर्चा रावसाहेब दानवे व पंकजा मुंडे यांच्याबाबतीत होत आहे . जातीय समीकरणांनी यावेळी वेगळाच निकाल दिला आहे.
लेखक……डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र, abhaydandage@gmail.com