किनवट, परमेश्वर पेशवे।किनवट, नांदेड, हिंगोली, परभणी येथील रुग्णमित्रांची सहस्रकुंड येथे सहकुटुंब सहल २५ ऑगस्ट रोजी झाली. लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून रुग्णमित्र मागील दोन वर्षापासून जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा मराठवाडा व खानदेश येथे करत आहेत.
यात जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना नाव नोंदणी कुठे करणे, कोणता ओपीडी नंबर कुठे, कोणती तपासणी कुठे होते, कोणते डॉक्टर कुठे भेटतात, कोणाला रक्ताची गरज आहे का, कोणाला ऑपरेशन साठी मदत करता येईल का, कोणाला भोजनाची व्यवस्था करता येईल का, अशा अनेक प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येत असते. श्रावण महिन्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तसेच आपापल्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी चार जिल्ह्यातील रुग्णमित्र सहस्रकुंड येथे ६०च्या संख्येने सहकुटुंब एकत्र आले होते.
याप्रसंगी डॉ. सुभाषजी जोशी ( बालरोग तज्ञ, बीड . देवगिरी प्रांत रुग्णमित्र प्रमुख ), रामदासजी निकम , श्रीमंगले सर, यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले . यावेळी सरकारी रुग्णालयात येणार्या रुग्णांना नि:स्वार्थ मदत करण्याविषयी, रक्तदात्यांची सूची तयार करण्याविषयी, तसेच आंतररुग्णांना मदत करण्याविषयी, ज्या रुग्णांना पुढील उपचारांची गरज आहे त्यांना ते उपचार मिळण्यासाठी काय करता येईल याबद्दल चर्चा करण्यात आली.
किनवट मधून डॉ. अशोक चिन्नावार, दिगंबर मुंढे, दिलभर भदाणे, कपिल कांबळे व इतर, नांदेड मधून सुधाकर थिटे, साईनाथ वैजवाडे, राजेश गंधपवाड, गंगाधर यमेवार व इतर, हिंगोलीतून साहेबराव बांगर, गुलाबराव घुगे, मनोहर पोपळाईत, सुरेश चिटकरे व इतर , परभणी येथून हनुमंत दास वैष्णव, शिवलिंग आप्पा खापरे, दीपक स्वामी व इतर असे साठ संख्येने उपस्थित होते.
डॉ. शशिकांत चिंतामणी ( देवगिरी प्रांत – रुग्णमित्र पूर्णवेळ ) यांनी या सहलीचे सर्व नियोजन केले होते, यांना सत्येश्वर पेशवे व त्यांचे मित्र मंडळ, सहस्रकुंड यांनी संपूर्ण व्यवस्था केली.