नांदेड/अर्धापुर। शेणी ता.अर्धापूर येथील सालदार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सौ. सुनीता आणि संजय हातागळे यांच्या १८ वर्षे वय असलेल्या आणि इयत्ता १२ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या ऋतुराजचा २० एप्रिल रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ऋतुराज यास घेऊन गेलेला व मृत्यूची खबर देणारा किंवा त्याचे रक्ताचे नातेवाईक मुलाच्या अंत्यविधीस आले नाहीत किंबहुना त्यांच्या वागणुकीवरून संशय बळावत चालला आहे.
अर्धापूर पोलिसांची कामगिरी आणि निमगाव आरोग्य उप केंद्रातील शव विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची कामगिरीही संशय निर्माण करणारी आहे. नातेवाईकांच्या मुलाने आमचा मुलगा ऋतुराज यास बोलावून नेले आणि काहीवेळाने फोन करून कळविले की, तुमचा मुलगा चोरंबा कॅनल मध्ये पाण्यात बुडाला आहे. एक रात्र मुलगा पाण्यात होता दुसऱ्या दिवशी मुलाचे प्रेत शोधण्यास यश आले. मुलाच्या पोटात बिल्कुल पाणी गेले नव्हते कारण त्याचे पोट फुगलेले नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर फायटरने मारहाण केल्याच्या खुना स्पष्ट दिसून येत होत्या.
आम्ही पती पत्नी आणि इतर नातेवाईकांनी पोलीस ठाणे अर्धापूर येथे जबाब दिलेत. मृत्यूची माहिती देणारा बेपत्ता आहे त्याला त्याचे नातेवाईक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याच्या मोबाईलचा कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग तपासावी आणि या मृत्यू प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेशन विभागा मार्फत चॊकशी करावी ही मागणी घेऊन शेतात सालगडी म्हणून काम करणारे पीडित आई वडील दि.१० जून पासून जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड समोर आमरण उपोषणास बसत आहेत.
यापूर्वी देखील पीडित आई वडिलांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी नांदेड याना निवेदने देऊन उपरोक्त मागण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असल्यामुळे उपोषणास पोलीस प्रशासनाकडून विरोध करण्यात आला आहे. आता आचार संहिता सीथिल झाली असून अजून कारवाई झाली नसल्याने पीडित आई वडील उपोषणास बसणार आहेत. त्या उपोषणास अनेक पक्ष संघटना पाठिंबा देणार आहेत.
दि. ५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलीस अधीक्षक यांना पत्र काढून योग्य कारवाई करण्याचे कळविले आहे. परंतु अद्याप कारवाई होत नसल्याने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. मयत मुलगा ऋतुराज हा हुशार आणि होतकरू होता. त्याला बारावीला ८०% गुण मिळाले असून सैनिक भरतीचे पत्र देखील त्यास आले असल्याचे त्याच्या आई -वडिलांनी सांगितले आहे. या उपोषणास माकप,सीटू,जमसं, डीवायफ सह इतरही संघटना पाठींबा देणार आहेत.