इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन अन् धन उद्धारकार्यास अर्पण करणारी काही नररत्ने होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करणार्या या ‘भारताच्या नरसिंहाने’ आपले ऐन तारुण्य स्वार्थत्यागपूर्वक राष्ट्राकरिता वाहून देशात नवजागृती निर्माण केली. ‘लोकमान्य’ पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी आणि चिकाटी व्यक्तीमत्त्वाची 1 ऑगस्ट या दिवशी पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यानिमित्त कणखर आणि जाज्ज्वल नेतृत्वाचा थोडक्यात परिचय करून घेऊ. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत राहील.
1. वृत्तपत्रांची आवश्यकता जाणून ‘केसरी’ आणि ‘मराठा’ साप्ताहिक चालू करणे – शाळांमधून केवळ विद्यार्थ्यांनाच शिक्षण देता येत असे; परंतु आता प्रत्येक भारतीयास त्याच्या पारतंत्र्याचे स्वरूप समजावून सांगायचे होते. लोकांना संघटित करून वर्तमानस्थितीचे भान आणि कर्तव्याची जाण त्यांच्यात निर्माण करायची होती. ‘आहे, हे सर्व प्रभावीरीत्या करायचे, तर वृत्तपत्रांचीच आवश्यकता आहे’, असा विचार त्यांनी केला. त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ साप्ताहिक चालू केले. काही दिवसांतच ही साप्ताहिके लोकप्रिय झाली. यामध्ये जनतेच्या दुःखाचे सविस्तर विवेचन आणि वास्तविक घटनांचा स्पष्ट उल्लेख असायचा. आपल्या अधिकारांसाठी लढण्याकरिता भारतीयांना सिद्ध केले जात होते. त्यांच्या भाषेमध्ये एवढे सामर्थ्य होते की, भ्याड व्यक्तीच्या ठायीही स्वातंत्र्याची लालसा निर्माण व्हावी. केसरीने इंग्रज सरकारच्या कित्येक अन्यायकारी गोष्टी उजेडात आणल्या. त्यामुळे शासनाने ‘केसरी’ला न्यायालयात खेचले आणि याचा परिणाम म्हणून टिळक अन् आगरकर यांना 4 मास सश्रम कारावासाची शिक्षा झाली. खिस्ताब्द 1898 मध्ये वेळी गोखले, रानडे यांनी स्वदेशीचे आंदोलन छेडले होते. टिळकांनी आपल्या साप्ताहिकाद्वारे, लेखांच्या आधारे हा विचार घराघरात पोहोचवला.
2. गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव या माध्यमांद्वारे लोकांना संघटित करणे – खिस्ताब्द 1890 ते 1897 ही सात वर्षे त्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाची ठरली. टिळक आता राजकारण धुरंधर बनले. सामाजिक सुधारणांसाठी तर त्यांनी शासनाविरुद्ध लढाईच चालू केली. बालविवाहाला प्रतिबंध आणि विधवा विवाहाला संमती मिळावी; म्हणून त्यांनी सर्वांना आवाहन केले. गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव या माध्यमांद्वारे लोकांना संघटित केले. मध्यंतरी त्यांची मुंबई विद्यापिठाच्या ‘फेलो’ या पदावर निवड झाली होती. याच वेळी त्यांनी ‘ओरायन’ हा ग्रंथ लिहिला.
3. प्लेगची महामारी पसरल्याने रुग्णालये उघडणे – खिस्ताब्द 1896 मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला, प्लेगची महामारी पसरली. त्यासाठी टिळकांनी रुग्णालये उघडली. स्वयंसेवकांच्या साहाय्याने रोग्यांची शुश्रुषा होऊ लागली. संपादकीय लेखातून दुष्काळ आणि महामारीत बळी पडलेल्या लोकांच्या संख्येचे आकडे निर्भयपणे प्रसिद्ध केले. शासनाकडून साहाय्य मागण्याचा आपला अधिकार असून त्यासंबंधी योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी जनतेला सतर्क केले; पण शासन व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या हीरकजयंती महोत्सवाची सिद्धता करण्यात गुंग होते. शेवटी महामारीवरच्या नियंत्रणासाठी रँड नावाच्या अधिकार्याची नियुक्ती झाली; पण रँड हा महामारीपेक्षाही भयानक ठरला. भारतीय जनतेवर अत्याचार करण्यात त्याने कुठेही कसूर ठेवली नाही. त्याच्या या अत्याचारामुळे एका युवकाने त्याला गोळी घालून ठार केले. ‘या हत्येमागे टिळकांचा हात असावा’, या संशयाने खिस्ताब्द 1897 मध्ये त्यांना कारागृहात डांबले.
4. राष्ट्राकरिता जीवन समर्पण आणि ‘गीतारहस्य’ या ग्रंथाच्या लेखनाचे महान कार्य – स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, हे पवित्र शब्द टिळकांनी लोकांना शिकवले. लोकांनी त्यांचा शस्त्रासारखा उपयोग केला. स्वदेशाविषयी प्रेम आणि पारतंत्र्याविषयी असंतोष निर्माण करण्याची क्रांती टिळकांनी केली. या सर्व कारवायांनी इंग्रज शासन चांगलेच चिडले आणि टिळकांवर खोटेनाटे आरोप लादून त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. न्यायालयात 14 वर्षेपर्यंत टिळक लढले. जनतेचा आवेश न्यून व्हावा; म्हणून शासनाने अत्यंत कठोर आणि निर्दय उपाय योजले. या दुष्ट कृत्यांमुळे टिळकांचे रक्त तापले आणि ‘देशाचे दुर्भाग्य’ या मथळ्याखाली त्यांनी केसरीमध्ये लेख लिहिला.
त्यांनी लिहिले ‘देशात बॉम्बची निर्मिती होणे, हे देशाचे दुर्दैव होय; परंतु ते सिद्ध करून फेकण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यास शासनच उत्तरदायी आहे.’ त्यांच्या या जहाल लिखाणामुळे शासनाची पक्की निश्चिती झाली की, जोपर्यंत टिळक मोकळे आहेत, तोवर शासनाला धोका आहे. या लेखाविषयी देशद्रोहाचा आरोप लावून 24 जून 1908 या दिवशी मुंबईला त्यांना पकडण्यात आले आणि 6 वर्षांची शिक्षा ठोठावली. या वेळी ते 52 वर्षांचे होते. याच वेळी त्यांना मधुमेहाचा विकार जडला; परंतु त्यांनी पर्वा केली नाही.
ब्रह्मदेशातील मंडालेच्या कारागृहात त्यांची रवानगी झाली. तेथे टिळकांची लहानशी लाकडी फळ्यांची खोली होती. सश्रम कारावासातून साधा कारावास अशी शिक्षेत घट करण्यात आली. त्यांना लेखन-वाचनाची सवलत मिळाली. इथेच त्यांनी ‘गीतारहस्य’ या ग्रंथाच्या लेखनाचे महान कार्य केले. एकान्त सुसह्य व्हावा; म्हणून ते सदैव लेखन आणि वाचन यांत दंग असत. 6 वर्षांचा कारावास समाप्त होईपर्यंत त्यांनी 400 पुस्तकांचा संग्रह केला. ‘स्वयंशिक्षक’ मार्गदर्शिकांचा उपयोग करून त्यांनी जर्मन आणि फ्रेंच भाषेचे ज्ञान संपादन केले. वेळेअभावी जी कामे ते पूर्वी करू शकत नसत, त्याकडे ते आता लक्ष पुरवू लागले. सकाळी प्रार्थना, गायत्री मंत्र आणि अन्य वैदिक मंत्रांचा जप अन् अन्य धार्मिक कृत्ये ते करू लागले. ते मंडालेच्या कारावासात असतांनाच त्यांची पत्नी सत्यभामाबाई यांचा भारतात मृत्यू झाला.
टिळकांचे जीवन दिव्य होते. लोकांच्या सन्मानाला आणि श्रद्धेला ते प्रत्येक दृष्टीने पात्र होते. तन, मन आणि धन सर्व अर्पण करून त्यांनी देशसेवा केली. शरीर थकलेले असतांनाही त्यांचा लोकजागृतीसाठी सतत प्रवास, व्याख्याने हा कार्यक्रम चालूच होता. जुलै 1920 मध्ये त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि 1 ऑगस्टच्या प्रथम प्रहरी त्यांचा जीवनदीप मालवला. ही दुःखद वार्ता वार्यासारखी सर्व देशभर पसरली. आपल्या या प्रिय नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी जनतेचा महासागर लोटला. आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत देशाकरिता लढत राहिलेल्या ध्येयवादी थोर राष्ट्रभक्ताला आमचे विनम्र अभिवादन !
…..संकलक : कु. प्रियांका लोणे, संपर्क क्र.: ८२०८४४३४०१