देशातील बौद्धांची संख्या किती आहे किंवा मतदान किती आहे याचा खल करीत बसण्यापेक्षा संपूर्ण देशातील विविध निवडणूकांमध्ये त्यांनी ठरवलं तर सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाप्रमाणे राजकीय परिवर्तन घडवून आणू शकतात, हे निर्विवाद सत्य आहे. बौद्धांचे धम्मविषयक अनेक प्रश्न आहेत. भारतात तर अस्पृश्यांनी बौद्ध धम्म स्विकारल्यानंतर तर आजच्या संदर्भानेही त्यात वाढच होत राहण्याची शक्यता आहे. धम्मस्विकारानंतर इथल्या अस्पृश्यांच्या जीवनात घडून आलेले मूल्यांतर प्रामुख्याने आचार विचार आणि वर्तनाशी संबंधित होते. शिक्षण घेणे, शासकीय नोकऱ्यांत स्थान मिळविणे म्हणजेच आपली आर्थिक स्थिती सुधारुन घेणे आणि बौद्ध म्हणून वागणे ही ढोबळमानाने असणारी ध्येय या बौद्धांसमोर होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाबरोबरच आपल्यासाठी काय काय केले, किती संघर्ष केला याची क्रांतीकारी गीतं गात वैयक्तिक तथा सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांविरुद्ध लढणे गरजेचे होते. याच काळात मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचाराची प्रकरणे होत होती आणि साहित्यनिर्मितीही होत होती. चळवळी उभ्या राहत होत्या आणि उभ्या उभ्या फुटत होत्या. नेते किंवा कार्यकर्ते इतरांच्या दावणीला स्वतःला बांधून घेत होते. राजकीय व्यवहाराकडे अत्यंत दुरस्थ दृष्टीने न पाहता भावनेच्या भरात स्वतःची आणि समुहाची वाताहत करुन घेण्याकडेच ही मानसिकता वळली. या वाताहतीचा हात कोणत्याही पर्यायाच्या हातात देता आलेला नाही. एखाद्या प्रश्नावर अत्यंत आवेशात एकत्र जमा होणारा आंबेडकरी समाज पुढील काळात आपल्या बुद्धीच्या जोरावर निवडणूकीच्या संबंधाने काही तुरळक विजयाच्या घटना वगळल्या तर आपल्यासाठी किंवा पुढच्या पिढीसाठी काही नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू करु शकलेला नाही.
बौद्धांना राजकीय मर्यादा आहेत असे म्हटले जाते. पण ते अंशतः खरे आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात पशुहीन जीणं जगणाऱ्या लोकांच्या जीवनाचं आणि पिढ्यानपिढ्या स्री स्वातंत्र्य न मर्हती अवस्थेत पुरुषसत्ताक व्यवस्थेचं गुलामीचं जीणं जगणाऱ्या तमाम भारतीय स्त्रियांच्या जीवनाचं सोनं केलं. हा संपूर्ण संघर्ष, बाबासाहेबांचे जीवनकार्य या देशातील सर्वच संधीवंचित, हक्कवंचित तसेच विषमतेने बरबटलेल्या व्यवस्थेतील आजचे सर्व ओबीसी, आदीवासी, शुद्रातिशुद्र यांच्यासह स्त्रियांमध्ये घडून आलेले सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक परिवर्तनासाठी म्हणजे एकूणच समग्र मूलभूत परिवर्तनासाठीच होते. तेव्हा मानवी जीवनाशी संबंधित कोणतेही क्षेत्र दूर राहणे शक्य नव्हते. १४ आॅक्टोबर १९५६ ची धम्मक्रांती धम्मस्विकारणाऱ्या आणि त्याप्रमाणे वागणाऱ्या लोकांमध्ये तसेच लोकांसाठी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वाची नवमूल्यदृष्टी निर्माण करणारी होती. या धम्मक्रांतीने एकाचवेळी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणले. पण बाबासाहेब नावाच्या महाप्रबुद्ध महामानवाला राजकीय क्षेत्रही दूर ठेवायचे नव्हते. त्यांनी या देशातील अस्पृश्य भारताचा प्रधानमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. बाबासाहेबांनी भारतीय राजकारणाचा सौंदर्यसिद्धांत मांडून ठेवला होता. तुमच्या राजकीय महामार्गाच्या बांधकामाची संरचना तयार करून ठेवली होती. त्याच वाटेने तुम्हा आम्हा सर्वांना जायचे होते. पण काय झाले? आम्ही वळणावळणावर बाबासाहेबांचे बोट सोडले. आम्ही अनेक वळणं घेतली आणि आम्ही भरकटलो, ही आजची वस्तुस्थिती आहे. ती नाकारताच येणार नाही.
बौद्धांना राजकीय मर्यादा असतात हे अंशतः खरे असले तरी बौद्धांनी इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेशी हातमिळवणी करून आपली पोळी भाजून घेतली आहे. राजकीय आरक्षणाचा फायदा सर्वच पात्र असलेल्या जाती जमातींनी घेतला. मग बौद्ध हे मागे कसे राहतील? ते मागे राहूच नयेत अशी अनुकूल व्यवस्था करण्यात आली. त्यांनी कोणत्या निवडणुका लढवाव्यात किंवा त्यांच्या उपकारानेच कोणती पदे भूषवावीत, हेही रीतसर ठरलेले असते. त्याची अंमलबजावणी होऊन साहेबांसाठी जिवाचं रान करणारा कार्यकर्ता पुढील काळात जन्माला आला. कारण तोपर्यंत लढवय्या आंबेडकरी कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला होता. त्याने निर्माण केलेला राजकीय आंबेडकरवादही हळूहळू अदृश्य होत राहिला. पुढे त्याचे निस्पृह अनुयायी निर्माण झाले नाहीत. जन्माला आले ते केवळ आपली दुकानदारी थाटणारे स्वार्थांध दलाल! या दलालांनी आपापल्या साहेबांचे पायताण डोक्यावर ठेवत आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या पाठीशी मतांची बेगमी असल्याची बतावणी करून आंबेडकरी समाज दावणीला बांधला. अशा परिस्थितीत इतर समाजधुरिणांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी अखिल मानवजातीच्या कल्याणाचा सिद्धांत मांडला. यात सर्व जाती जमातींना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न केले. एकट्या बौद्धांच्या मतदानावर आपण निवडून येऊ शकत नाही, या राजकीय मर्यादेचे दिव्यज्ञान त्यांना प्राप्त झाले होते. हे ज्ञान तर सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांच्या तळाशी राहणाऱ्या जलचरांनाही प्राप्त झाले होते. म्हणूनच त्यांनी आपला वेगळा रस्ता धरला होता. वेगळी वाट चोखाळली होती. याचे त्यांना कधीही वाईट वाटले नव्हते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीत दि. १५ आॅक्टोंबर १९५६ रोजी जे भाषण केले, त्यातील काही भाग राजकीय हक्कासाठी होता. काय म्हणाले होते बाबासाहेब? ‘आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल. याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहित आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले. ज्याने जे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच. हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे; आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिध्द करून देईन.’ ही बाबासाहेबांनी मांडलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. येणाऱ्या पिढ्यांना पथदर्शक आहे. आपण राजकीय दृष्ट्या काय करावे आणि काय करु नये याची दिशा बाबासाहेबांच्या एवढ्या भाषणातून मिळते. माझ्यावर विश्वास ठेवा असे बाबासाहेब म्हणतात. आपण राजकीय परिवेशात तो गमावला आहे. पण तरीसुद्धा बौद्ध उमेदवार उभा करून निवडून आणण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे. आपल्याला राजकीय मर्यादा आहेत म्हणून आपण प्रयत्नच करायचे नाहीत. हीच खरी आपली मर्यादा आहे. राजकारणातील आंबेडकरी चळवळ उभी करणे ही काही साधी बाब नाही. आजपर्यंतचा इतिहास बघता पुढील काळात किती मोठा संघर्ष करावा लागेल आणि कुठून सुरुवात करावी लागेल ही अत्यंत चिंतनीय बाब आहे.
बाबासाहेबांनी वरळी मुंबई येथे १४ जानेवारी १९५५ रोजी जे भाषण दिले होते ते जनता मध्ये २२ जानेवारी १९५५ रोजी छापून आले होते. धम्मस्विकारापूर्वी केलेल्या या भाषणात राजकारण आणि निवडणुका यांबाबत त्यांनी केलेले भाष्य अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वार्थाने बरबटलेल्या आजच्या छिचोर नेते आणि छपरी कार्यकर्त्यांसाठी ते चपखल बसते. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले होते, ” लोक म्हणतात राजकारणात माझी हानी झाली. आता बुद्ध धम्मानेही माझे नुकसान होणार आहे. परंतु माझे जे नुकसान होणार आहे ते नुकसान सोसण्यास मी तयार आहे. धर्म ही माझी स्वतःची खाजगी बाब आहे. बुद्ध धर्म मला पटला. तो मी उचलला. राजकारणातील खोट्या निवडणुका मला नको आहेत. खोट्या निवडणुकांनी मी महामंत्री देखील होऊ शकेन. पण ते मला नको. राजकारण म्हणजे क्रिकेटचा खेळ झाले आहे. एक संप्रदाय नव्हे. रामानंदी, कबीरपंथी माणसाला तू पंथ सोड असे सांगितल्याने तो पंथ सोडणार नाही. त्याचप्रमाणे माझा धर्म अटळ आहे. हा धर्म मी स्वीकारला, त्या मार्गानेच मी गेले पाहिजे.
मी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, तुम्हीही स्वीकारा. नुसत्या अस्पृश्य समाजानेच तो स्वीकारून चालणार नाही तर साऱ्या भारताने व त्याचबरोबर साऱ्या जगानेही बुद्ध धर्म स्वीकारावा अशी माझी इच्छा आहे. अर्ध्या अधिक जगात बौद्ध धम्म आहेच परंतु भारत बौद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. परंतु आपण ते सोयिस्करपणे विसरलो आहोत. आपल्याला या चळवळीची गरज नाही अशी आपली मानसिकता आहे. आजपर्यंत आंबेडकरी चळवळीत अनेक लोक संपले आहेत अशी आपली धारणा आहे. त्यामुळे आपला फायदा कशात आहे हे आपण पाहत असतो. राजकारणाने समाज एकसंघ ठेवला नाही. अनेक नेते कार्यकर्ते वेगवेगळ्या गटातटात विखुरलेले आहेत. आपल्या स्वार्थी राजकारणाने चळवळीचे नुकसानच झाले आहे.
आंबेडकरी युवा भारतीय राजकारणापासून दूर राहणे पसंत करतो. एकत्र तो अधिकाधिक शिक्षण घेत राहतो किंवा तो अत्याधिक व्यसनाधीन झालेला आहे. या दोहोव्यतिरिक्त बाकी जे आहेत त्यांचा जगण्याशी संघर्ष सुरू आहे. गुंडगिरी आणि वाम मार्गाला असलेल्या युवांना आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि पर्यायाने देशाचेही काही देणे घेणे नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीत तो उभा राहत नसल्याने एक सशक्त नेतृत्व उभे राहत नाही. मात्र घराघरांत बाबासाहेब तयार झाले असे काही जाणकार म्हणतात ते उगाच नाही. समाज म्हणून एकत्र येण्यासाठी गल्लोगल्ली निर्माण झालेले नेतेच कारणीभूत आहेत. कारण त्यांचे गाॅडफाॅदर दुसरेच असतात. खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळीत आता राजकीय प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत पाहिले तर आंबेडकरी राजकीय चळवळीची पुर्णतः वाताहत झाली असून ती फक्त जयंती आणि धम्म परिषद साजरी करण्यापुरतीच राहिली आहे, असे काहींचे मत आहे. गटातटात आणि विविध राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या दुय्यम तिय्यम नेतृत्वामुळे समाज एकसंध राहिलेला नाही. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड आणि पँथरच्या झंझावातानंतर आंबेडकरी समाज एकत्र येऊ शकेल असे नेतृत्व मिळालेले नाही. आंबेडकरी नेतृत्वाला मर्यादा निर्माण केली जात आहे, ते आपण पाहतोय आहोत. प्रस्थापितांविरोधी विचार नष्ट करण्याचे किंवा काबूत ठेवण्याचे डावपेच आखले जात आहेत.
देशात याआधीही धर्माध, राज्यघटनाविरोधी शक्तींनी डोके वर काढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या त्या वेळी, त्याविरोधात आंबेडकरी चळवळ पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरली होती. सामाजिक प्रश्नांवरची लढाई असो की, मतपेटीतील राजकीय युद्ध असो, आंबेडकरी चळवळीने महाराष्ट्राच्या पुरोगामी भूमीत तरी धर्माध, लोकशाहीविरोधी, राज्यघटनाविरोधी शक्तींना पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच प्रस्थापित राजकीय पक्षांना आंबेडकरी राजकीय शक्तीची दखल घेणे भाग पडते. अर्थात प्रतिगामी शक्तींविरोधात लढण्यासाठी आंबेडकरी चळवळ आमंत्रणाची वाट बघत नाही. घटनात्मक मूल्यांच्या जपणुकीसाठी सदैव जागृत असलेली ही चळवळ प्रतिगामी शक्तींशी लोकशाही मार्गाने दोन हात करण्यास सज्ज असते. परंतु नव्याने उभ्या राहिलेल्या परिस्थितीचे आकलन करून घेण्याच्या क्षमतेचा अभाव किंवा उदासीनता, संघटनेची ताकद उभी करण्यापेक्षा, सवतेसुभे मांडून राजकीय सौदेबाजी करून सत्तेची चव चाखण्याची अभिलाषा यामुळे आंबेडकरी चळवळीची वाताहत झाली आहे. ज्यांचे प्रतिनिधित्व करायचे आहे त्या दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी, भूमिहीन शेतमजूर, गरीब-कष्टकरी माणूस यांच्या भौतिक समस्यांवर आंदोलने उभी करण्यापेक्षा भावनिक प्रश्नांभोवती चळवळ फिरवत ठेवण्यात प्रस्थापित यशस्वी झाले आहेत. आंबेडकरी चळवळ समग्र समाजाला नवा विचार देणारी चळवळ आहे. समाजाच्या पुनर्रचनेची चळवळ आहे. परंतु ही वस्तुस्थिती पुर्णपणे बदलली असून प्रस्थापित राजकीय पक्षांकडे भीक मागणाऱ्यांची चळवळ बनली आहे. आज देशात पुन्हा धर्माधारित राजकारणाचा जोर वाढत आहे. त्याविरोधात लढण्यासाठी वेगवेगळ्या विचारांचे व एकमेकांविरोधात लढणारे पक्ष एकत्र येत असतील, तर आंबेडकरी राजकीय चळवळीला निर्णायक भूमिका बजावण्यासाठी एकसंधपणे पुढे यायला काय हरकत आहे? समाजानेच एकत्र येऊन चळवळीला भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण एकत्र आलो, भरकटलेल्या समाजात आंबेडकरी विचारधारेची पुनर्बांधणी केली तर या चळवळीला निश्चित भवितव्य आहे.
– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड. मो. ९८९०२४७९५३