नांदेडl मागील 2014 पासून आपण नांदेड लोकसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवार आहोत, 2019 आणि 2024 मध्येही आपण भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती.
आता लोकसभेच्या होणार्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण सज्ज आहोत, आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पक्षश्रेष्ठींनी सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवार जाहीर करावा, अशी अपेक्षा माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केली. दरम्यान रातोळीकर यांच्यावतीने आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा व स्नेह भोजन सोहळ्यात उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राम पाटील यांनाच उमेदवारी मिळावी, अशी एमुखी मागणी करण्यात आली.
आगामी लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. रातोळीकर यांच्या निवासस्थानी सोमवारी नांदेड जिल्हा शहर व भोकर विधानसभा या मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ता व पदाधिकार्यांची सुसंवाद बैठक पार पडली. यावेळी आ. रातोळीकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, आगामी काळात विधानसभेसह नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, मनपा, नगर पालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, हे वर्षे म्हणजे लोकशाहीच्या उत्सवाचे वर्ष आहे. मी भाजपचा 3 वेळा उपाध्यक्ष, 3 वेळा सरचिटणीस आणि 3 वेळा जिल्हाध्यक्षपद भूषविले आहे. पक्षाच्या घटनेत कार्याध्यक्षपद नसतानाही पक्षाने माझ्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. ही सर्व पदे भूषविताना आपण पक्षसंघटनवाढीवर भर दिला, कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
निःस्वार्थपणे काम करून सुमारे एक हजार कार्यकर्त्यांना प्रशासकीय कमिट्यावर संचालक म्हणून नियुक्त्या मिळवून दिल्या. सर्वांनी एकसंघ होऊन, एकदिलाने काम करण्याची गरज आहे, आपल्या भावना व्यक्त केल्याशिवाय काही मिळत नाही, त्यासाठी बोलावेच लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा अत्यंत दूर्दैवी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितभाई शहा यांच्या सभा झाल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नांदेडमध्ये तळ ठोकून असतानाही हा पराभव पत्करावा लागला. 2019 मध्ये ज्याप्रमाणे बुथ पातळीवर कार्यकर्त्यांना काम केले, तसे काम यावेळी झालेले नाही, हे पराभवाचे प्रमुख कारण मानले जात असले तरी बुथ पातळीवर कार्यकर्त्यांनी काम का केले नाही? याचेही आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असे मत राम पाटील यांनी व्यक्त केले.
कंदकुर्ते यांनीही दिल्या शुभेच्छा कार्यकर्त्यांनी गट-तट बाजुला ठेवून काम करावे, उमेदवार कोणीही असो, कमळ हे पक्षाचे चिन्ह असून कमळाच्या विजयासाठी झटून कामाला लागणे गरजेचे आहे. बुथनिहाय कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे लोकसभेत पराभव झाला, ही चुक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे, असे सांगून महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी रातोळीकर यांना लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळावी, अशा शुभेच्छा देत उमेदवारी मिळाल्यास शहरातील दोन्ही मतदारसंघ त्यांच्या विजयासाठी झटून कामाला लागतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
उपस्थितांचे आभार मानताना प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापु देशमुख यांनीही रातोळीकर यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रविण गायकवाड,अॅड. दिलीप ठाकूर, सुनिल जोशी, शीतल भालके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी महानगराध्यक्ष व ज्येष्ठ डॉ. धनाजीराव देशमुख, बालाजीराव देशपांडे, एल.के.कुलकर्णी, शिवप्रसाद राठी, संतोष वर्मा, दिलीपसिंघ सोडी, मिलिंद देशमुख, बाळू खोमणे, आशीष नेरलकर, अमोल कदम, सुधाकर कदम, नागोराव भांगे, रामराव भालेराव, प्रताप पावडे, बंडू देशमुख,व्यंकटेश साठे, अभिषेक सौदे अजय बिसेन,े किशोर पाटील लगळूदकर, गणेश कापसे, हनमंत देशमुख, साहेबराव गायकवाड मनोज जाधव श्रद्धाताई चव्हाण महादेवी मठपती, यांच्यासह शकडो शहरी व ग्रामीण कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीनिमित्त गेल्या अनेक दिवसानंतर भाजपातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले होते. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे एकमेकांशी पारिवारिक चर्चाही झाल्याने सर्वांच्या चेहर्यावर एक समाधानाची भावना दिसत होती. त्यामुळे ही बैठक राजकीय नसून एक कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा ठरला.