नांदेड| ६३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य महोत्सवांतर्गत गुरुवारी (ता.५) नांदेड केंद्रात सादर झालेल्या “गांधी आंबेडकर” या ऐतिहासिक नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. सुप्रसिद्ध नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी यांच्या लेखणीतून साकारलेले हे नाटक राहुल जोंधळे यांनी दिग्दर्शित केले आहे. कुसुम प्रेक्षागृहात सादर झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
“गांधी आंबेडकर” हे नाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या वैचारिक संघर्षावर आधारित आहे. नाटकात अस्पृश्यता, जातीयवाद, आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक-राजकीय घडामोडींचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकरांच्या बालपणातील अन्याय-अत्याचार, अस्पृश्यतेचे चटके, आणि त्यांचे संघर्षमय आयुष्य याला दृश्य स्वरूप देण्यात आले आहे. महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील संवादांमधून धर्मातील वर्ण-जात व्यवस्थेवरील भिन्न दृष्टिकोन मांडण्यात आला आहे.
डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य समाजासाठी केलेली लढाई, धर्मांतराचा ऐतिहासिक क्षण, आणि गांधी हत्येचा प्रसंग यांसारख्या महत्त्वपूर्ण घटना नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. नाटकाचा मूक आणि विचार करायला लावणारा शेवट प्रेक्षकांना अंतर्मुख करतो. नाटकातील प्रमुख भूमिका विजय गजभारे (डॉ. आंबेडकर), अजिंक्य गायकवाड (महात्मा गांधी), चंद्रकांत तोरणे (विदुषक), प्रांजली मोतीपवळे (रमामाता), आणि पदमजा पंडित (कस्तुरबा गांधी) यांनी साकारल्या, तर सुमेध सोनसळे, साहिल धोंगडे, स्वयंदीप जोंधळे, व संजना हनवते यांनी अन्य भूमिकांमध्ये सहभाग नोंदवला.
प्रेक्षकांच्या बदललेल्या अपेक्षांना ध्यानात घेऊन नाटकाच्या सादरीकरणात संवादांपेक्षा घटनांना प्राधान्य देण्यात आले. महत्त्वाच्या प्रसंगांना दृश्यरूप देत संवाद कमी करण्यात आले. शेवटच्या दृश्यात धर्मांतर व गांधी-आंबेडकर यांच्या निर्वाणाद्वारे सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले. सामाजिक आणि ऐतिहासिक घटनांचे जिवंत चित्रण, संवादांऐवजी घटनात्मक मांडणी, तसेच दृश्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले विचार या नाटकात प्रेक्षकांना पाहायला मिळाले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे सुरु असलेली ही मराठी राज्य नाट्य स्पर्धा स्पर्धा अप्पर मुख्य सचिव श्री.विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, सह-संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक म्हणून किरण चौधरी आणि त्यांची टीम परिश्रम घेत आहेत.