हिमायतनगर,अनिल मादसवार| रेल्वे, ट्रैक्टर, टेम्पोने शहरात दाखल जालेल्या बाप्पा गणरायाचे शहरातील बाल – गोपाल व नवतरुण युवकांनी ढोल ताशा व गणपती बाप्पा मोरया…च्या गजरात जल्लोषापूर्ण वातावरणात स्वागत केले. दरम्यान पावसाच्या सारी कोसळल्याने गणरायाच्या स्वागताला वरून राजाही अवतरले असल्याने उत्सवाच्या आनंदात आणखीन भर पडली होती. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी मंगल वाद्य व पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शहर व ग्रामीण परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने निनादून गेला होता.
श्रावण शुक्ल ४ दि.०७ सप्टेंबर शनिवारी अवघ्या देशभरात गणरायाचे थाटात आगमन झाले असून, गणरायाच्या स्वागतासाठी वरून राजाने स्थापनेच्या दिवशी हजेरी लाऊन गणेशाचे जोरदार स्वागत केले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर आणि बाजारपेठेत थाटलेल्या दुकानात विघ्नहर्ता श्री गणेशाची मूर्ती खरेदीसाठी बाल -गोपलानी एकाच गर्दी केली होती. तालुक्यातील हजारो गणेश भक्त शहरात दाखल होऊन ट्रैक्टर, ऑटो, जीप, दुचाकी, हाथगाडे, बैलगाडीसह अन्य वाहनाने बाप्पा गणरायाला आपल्या गावी प्रतिष्ठापना स्थळी घेऊन जातानाचे चित्र दिसून आले. वर्षभरानंतर आलेल्या गणरायाचे ठिकठिकाणी बालगोपाळसह जेष्ठ व नवतरुणांनी देखील बाप्पाच्या स्वागत मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
आजपासून गणेशोत्सव काळातील ११ दिवस मोठ्या उत्साह व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणात गणेश मुर्त्या विक्रीचे स्टाल, कळलावीची फुले, फळे, मक्काचे कणसे, केळीचे कंद, काकड्या यासह उपवासासाठी लागणारे केळी, सफरचंद, सेप, डाळिंब, पेरू, चिकू व सजावटीच्या साहित्याने बाजारातील दुकाने फुलल्याचे दिसून आले आहे. तसेच शहरातील कनकेश्वर तलावाच्या काठावर वसलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक गणेश मंदिरात श्रीची स्थापना पुरोहित साई बडवे याच्या मंत्रोचार वाणीत मोठ्या थाटात करण्यात आली.
येथील श्री परमेश्वर मंदिरात सायंकाळी ५ वाजेच्या मुहूर्तावर गणरायाची प्रतिष्ठापना पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी मंदिराचे संचालक अनेक गणेशभक्त महिला – पुरुष उपस्थित होते. तर मानाचा वडाचा गणपती मंडळाने देखील स्थापनेचा मुहूर्त साधून अभिषेक महापुराजा करून प्रसाद वितरित केला आहे. दरम्यान गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्याने रूटमार्च काढून पथसंचलन केले. आणि शांततेची परंपरा कायम ठेऊन उत्सव पार पाडावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले आहे.
बजरंग चौक आणि छत्रपती चौकातील राजाच मंडळाकडून भव्य स्वागत
हिमायतनगर शहरात गेल्या ५० वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जोपासणाऱ्या नवप्रशांत गणेश मंडळ आणि न्यू प्रताप गणेश मंडळाच्या युवकांनी गणपती बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात जलौषात स्वागत केले. येथील श्री परमेश्वर मंदिरातून ट्रैक्टरवर मनमोहक मूर्ती ठेऊन ढोल – ताश्याच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. फटाक्याची आतिषबाजी करत मूर्तीला स्थापनस्थळी नेऊन सायंकाळी पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची प्रतिष्ठापना व आरती महापूजा संपन्न झाली. यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषाने शहर परिसर दणाणून निघाला.