हिमायतनगर| आषाढी एकादशीचे औचित्य साधून शहरातील एका खाजगी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाई आणि वारकऱ्यांची भूमिका साकारून टाळमृदंगाच्या गजरात दिंडी काढून शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. बालवारकऱ्यांची दिंडी येथील मंदिरात येताच श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने चिमुकल्या बालकांना खाऊचे वाटप करून अभिनंदन करण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्ताने श्री परमेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक महापूजा संपन्न झाली तसेच मंदिरात दररोज सकाळी पुरोहित कांतागुरु यांच्या मधुर वाणीत गीता पठण सुरु आहे. आषाढी निमित्ताने शिवभक्त सुनंदा दासेवार व त्यांच्या सहकारी महिलांच्या वतीने पंढरपूरच्या विठुराया प्रमाणे श्री परमेश्वराच्या मूर्तीला सजविण्यात आले. दुपारी ॐ कार संस्था पुणे निर्मित प्रस्तुत ” पंढरीची वारी ” या अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हजारो भावीक भक्तांनी जय जय राम कृष्ण हरी… विठ्ठल विठ्ठल म्हणत हरिनामाचा आणि श्रीचा जयजयकार करत श्री परमेश्वर आणि विठुरायाचा अनेकांनी दर्शन घेतलं. यावेळी मंदिर कमेटी आणि भाविक भक्तांच्या वतीने आषाढी निमित्ताने केळीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले.
दरम्यान शहरातील विविध शाळांच्या चिमुकल्या बालकांनी विठ्ठल रुख्माई आणि वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. दि.१८ रोजी शहरातील आर एन एस स्कुलच्या चिमुकल्यांनी दिंडी येथील श्री परमेश्वर मंदिरात दाखल होताच मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, जेष्ठ संचालक प्रकाशराव शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल भगत, सुभाषराव शिंदे, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ सूर्यवंशी, प्रकाश हंपोलकर, पंडित ढोणे, गजानन वारकडं, बंटी गुड्डेटवार, किरण माने, राजू राहुलवाड, आदींसह अनेकांच्या हस्ते चिमुकल्या बालकांना खाऊचे वितरण करण्यात आले. तसेच चिमुकल्यांनी साकारलेल्या विठू माउली आणि वारकऱ्यांच्या भूमिकेचे आणि त्यांना शिकवण देणाऱ्या गुरुजनांचे मान्यवरांनी कौतुक केले.