नांदेड| पॅरिस येथे २८ ऑगस्ट २०२४ ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या पॅरालिंम्पिक स्पर्धेत भारतीय ध्वजवाहकाचा बहुमान नांदेडची भुमिकन्या भाग्यश्री जाधव व हरियाणाचा खेळाडू सुमित अंतिल यांना मिळाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेली शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिने जपान मधील कोबे येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात दुसरा क्रमांक पटकावून रौप्य पदक पटकावले. त्यामुळे तिची निवड पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिंम्पिक स्पर्धेसाठी झाली आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाकडून ३२ महिलांसह एकूण ८४ खेळाडू सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेत ध्वजवाहकाचा मान हा अत्यंत महत्त्वाचा सन्मान समजल्या जातो. यंदाचा हा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्राची लेक तथा अष्टपैलू आंतराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव व हरियाणाचा भालाफेकपटू सुमित अंतिल या दोघांना मिळाला आहे. त्याची घोषणा नुकतीच नवी दिल्ली येथून करण्यात आली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या स्पर्धेत अव्वल स्थानावर असलेल्या भाग्यश्री जाधव हिने आपल्या आठ वर्षांच्या क्रीडा कारर्किदीत नेहमीच महाराष्ट्राचे त्याच बरोबर देशाचे प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्रासह देशाची शान कायम राखली आहे. भाग्यश्री जाधव हिने प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण (बंगळूरु), प्रशिक्षक श्रीमती पुष्पा (बंगळूरु), सहाय्यक प्रशिक्षक रविंदर सर, स्ट्रेन्थ व कंडिशनिंग प्रशिक्षक मयुर रसाळ व गुरुबंधु मार्गदर्शक पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. या सन्मानाबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.
पॅरालिंम्पिक स्पर्धेत भारतीय ध्वजवाहकाचा मान मिळाल्यामुळे मला अतिव आनंद झाला आहे. माझा उर भरून आला आहे. महाराष्ट्राच्या मातीला माझ्या रुपाने ही संधी मिळाली. हे माझे मी अहोभाग्य मी समजते. ही अत्यंत गौरवशाली कामगिरी पार पाडण्याची जबाबदारी सोपविल्याबद्दल इंडियन पॅरालिंम्पिक कमिटीच्या सर्व मान्यवरांचे आभार तिने व्यक्त केले आहेत. भारताच्या तिरंगा ध्वजाची आण-बाण आणि शान कायम राखू,अशी प्रतिक्रिया भाग्यश्री जाधव हिने व्यक्त केली.