नांदेड,अनिल मादसवार| विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणाऱ्या सायबर विभागाच्यामार्फत जिल्ह्यातील सोशल मीडियाचे सनियंत्रण जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर राजकीय पोस्ट टाकताना सर्वांनी सावध असावे, आचार संहितेचा भंग झाल्यास तात्काळ गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व पोलीस दलातील अन्य सदस्यांची यासंदर्भात बैठक झाली असून सायबर सेलला निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात एमसीएमसी ( माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती ) मध्ये सायबर सेलची एक संपूर्ण टीम यासाठी कार्यरत झाली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये या सेलमार्फत काही गुन्हे दाखल झाले होते.
जिल्ह्यातील नागरिकांच्या फेसबुक,ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअप अकाउंटवर जातीवाचक, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, राजकीय वैमनस्य वाढवणाऱ्या पोस्ट काही समाजकंटक, असामाजिक तत्व टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक काळामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी काही घटक अशावेळी कार्यान्वित होतात. अशांना लक्षात घेऊन सर्वांच्या सोशल माध्यमांची तपासणी सुरू झाली आहे. विशेषतः यापूर्वी अशा पद्धतीच्या विचित्र पोस्ट टाकणाऱ्या काही असामाजिक तत्त्वासंदर्भात सायबर सेल आणखी सतर्क झाले आहे.
त्यामुळे अशा कोणत्याही पोस्ट आपल्या अकाउंट वरून फॉरवर्ड होणार नाही. प्रसारित होणार नाही. याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा व पोलीस प्रशासनाने केले आहे. कधीतरी कुठेतरी झालेली घटना पुन्हा पुन्हा दाखवणे,धार्मिक स्थळांच्या तोडफोडीचे जुने व्हिडिओ दाखवणे,चुकीचे व्हिडिओ व्हायरल करणे, समाज,धर्म धोक्यात असल्याच्या खोट्या आकडेवारीला सादर करणे, चुकीचे तपशील दाखवणे, असभ्य व्हिडिओ व्हायरल करणे, चित्रफितीशी छेडछाड करणे, चुकीचे अर्थ निकेल अशा पद्धतीचे एडिटिंग करणे, अशा प्रकारच्या कुरापती केल्या जाऊ शकतात. नागरिकांनी अशा पद्धतीचे व्हिडिओ कुठे टाकले गेले असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला लक्षात आणून देण्याचे आवाहन शासनाने केले आहे .
जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागली असून कुटुंबप्रमुखांनी,वडीलधाऱ्यांनी आपल्या घरातील सर्व मोबाईल धारकांना या संदर्भात अवगत करावे. तसेच व्हाट्सअप ग्रुपच्या सर्व ॲडमिनने यासंदर्भात आपल्या ग्रुपमध्ये सूचना टाकावी. पुढील 40 दिवस सामाजिक स्वास्थ बिघडवेल अशा पद्धतीचे कोणतेही पोस्ट पडणार नाही, याची काळजी एडमिनने घ्यावी, अशीही प्रशासनाने सूचना केली आहे.
समाज माध्यमे सर्वाच्या हाती असून याचा दुरुपयोग होता कामा नये. एखादी तथ्यहीन बातमी वाऱ्यासारखी पसरविण्याचे सामर्थ्य समाज माध्यमात आहे. त्यामुळे व्हॉटसअप व तत्सम प्रसार माध्यमांचा वापर करताना आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची दक्षता प्रत्येकांने घेणे आवश्यक आहे. ग्रुप अॅडमिनने याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन एमसीएमसीमधील समाज माध्यमांचे प्रमुख, पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी केले आहे.
संपर्क साधा
आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 83O82741OO हा नंबर दिला असून यावर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख धीरज चव्हाण यांनी केले आहे.