नांदेड | राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”राबविण्यात येत आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी व पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील समाज कल्याण कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली.
या बैठकीला समाज कल्याण विभाग लातूरचे समाज कल्याण अधिकारी गट-ब प्रादेशिक उपायुक्त, व्ही.एस. केंद्रे, जनसंपर्क अधिकारी एस.आर. देवकत्ते हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये समाज कल्याण कार्यालय अधिनस्त कार्यरत गृहपाल, मुख्याध्यापक अनुदानित वसतिगृहाचे वसतिगृह अधिक्षक , अनु.जाती आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक असे जवळपास 200 ते 250 कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या बैठकीत प्रादेशिक उपायुक्त व्ही.एस.केंद्रे यांनी नांदेड जिल्हयातील पात्र लाभार्थ्याचे जास्तीत जास्त अर्ज 31 ऑगस्ट 2024 पर्यंत भरण्याचे निर्देश उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले. नांदेड जिल्हयातील पात्र ज्येष्ठ नागरीकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा व मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा एकही लाभार्थी वंचीत राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिल्या. अधिकारी कर्मचारी यांनी पात्र लाभार्थ्यांचे वैयक्तीक भेट देवून अर्ज भरून घ्यावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची पहीली बस किंवा रेल्वेही नांदेड जिल्हयातून निघेल अशी सकारात्मक अपेक्षा व्यक्त करुन सर्व कार्यालयीन यंत्रणांना जोमाने काम करण्याबाबत बैठकीत सूचना दिल्या. या बैठकीचे सुत्रसंचलन तालूका समन्वयक गजानन पंपटवार यांनी केले.