नांदेड| लोहा तालुक्यातील उमरा येथील नवीन वस्ती असलेल्या रामजी आंबेडकर नगर येथे भर पावसाळ्यात ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे गेल्या पंधरा दिवसापासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने रहिवाशी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून पाणी पुरवठा लवकर सुरळीत करून देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
लोहा तालुक्यातील उमरा हे सर्कलचे गाव आहे. तसेच पाच तांडे मिळून येथे गट ग्रामपंचायत असल्याने या गावासाठी शासनाचा मोठा निधी येतो मात्र म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यातच भर पावसाळ्यात ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे नवीन वस्ती असलेल्या रामजी आंबेडकर नगरात गेल्या पंधरा दिवसापासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
या बाबतीत गेल्या आठ दिवसांपूर्वी नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून बोअरची मोटार जळाली असून ती पूर्ववत करून आमची पाण्याची समस्या सोडविण्याची विनंती केली असता दोन दिवसात तुम्हाला पाणी पुरवठा सुरू करून देतो असे सांगितले होते.मात्र त्या घटनेला आज दहा दिवस झाले तरी पाणी पुरवठा झाला नाही, तसेच सरपंच यांनाही येथील नागरिकांनी भेट घेऊन आमच्या पाण्याचा प्रश्न सोडावा अशी मागणी केली असता, मी तुम्हाला पाणी पाजऊ का ? असा प्रति सवाल करून मी तुमच्या पाण्याची व्यवस्था करणार नाही तुम्हाला काय करायचे आहे ते करा असे बोलून दाखवले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे वस्तीतील नागरिकांनी दि.२५- सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काडून हे निवेदन संगणक कर्मचारी यांचे कडे सादर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन सिरसाट, व पुंडलिक सिरसाट, पंजाब सिरसाट उपस्थित होते. मात्र यावेळी सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे उपस्थित नव्हते.
अनंत अडचणी व कामाचे दिवस असता भर पावसाळ्यात येथील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या निवेदनावर- माजी ग्रामपंचायत सदस्य- व्यंकटेश पट्टेकर, जेष्ठ नागरिक- पुंडलिक वाघमारे, माजी सरपंच- नागोराव पट्टेकर, माधव पट्टेकर, सुद्दोधन पट्टेकर, श्रीकांत पवार, परमेश्वर जोंधळे, चांदू वाघमारे, राजू वाघमारे, शोभबाई गवाले, सुलोचनबाई, संगीताबाई, सह वस्तीतील अनेकांच्या सह्या आहेत.व उपस्थित होते.