नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, अधिकारी, आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी, जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विविध विभागांनी आपल्या कार्याची ओळख करून देण्यासाठी स्टॉल्स उभारले होते. यामध्ये पशुसंवर्धन, कृषी, आणि उमेद आदी विभागांचे स्टॉल्स विशेष आकर्षण ठरले. या स्टॉल्समधून शेतकरी आणि नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेचे काम स्वच्छ बचत गटासोबत संवाद या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आला.
समारंभात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते निवडक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.