उस्माननगर, माणिक भिसे। येथील ग्रामपंचायत कार्यालय व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत संयुक्तपणे मुस्लिम समाजाचे स्मशानभूमीत जवळपास साडेसहा एकरच्या असलेल्या कब्रस्थान जागेत सागवान रोपांची लागवड केली ,त्या रोपांची वाढ जोमदार होण्यासाठी मुस्लिम बांधव स्वस्फुर्तीने व श्रमदान करून गाजर गवताचे निर्मुलनासाठी पुढे आले आहेत.
रोपांची काळजी घेण्यासाठी रोपांना पाणी देणे, गाजर गवत, गवत, कचरा काढून टाकण्यात येत आहे. सकाळी व सायंकाळी जमेल तेव्हा तरुण एकत्रित येऊन परिश्रम करून रोपांची काळजी घेतात. याच माध्यमातून मागील चार वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पोलीस वसाहत परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड केली होती.आज तो परिसर नेत्रदीपक ठरावा असा हिरवाईने बहरला आहे हे विशेष.
” कब्रस्थान परिसरात यावर्षी १००० सागवान रोपांची मनरेगा माध्यमातून वृक्षलागवड केली असून प्रत्येक रोपांची जोपासना करण्यात येत असल्याची माहिती रोजगार सेवक संभाजी काळम पाटील यांनी दिली. लोकसहभागातून रोपांची जोपासना करीत असलेल्या उत्साही तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामसेविका सौ. शिंदे, व्यंकटराव पाटील, संजय वारकड, अमिनशहा, अशोक काळम,श्री.माने,लोक सहभागासाठी प्रेरित करणारे व्यापारी बाबुभाई पिंजारी, पत्रकार गणेश लोखंडे,अमजद खान पठाण, माणिक भिसे, लक्ष्मण कांबळे आदींची यावेळी उपस्थिती होती.