नांदेड। देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, जलसंस्कृतीचे जनक, मराठवाड्याचे भगीरथ तथा नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत नांदेड शहर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या विद्यमाने योनेक्स सनराईज महाराष्ट्र 1 ली ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्परधेचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडले.


यावेळी उपस्थित राज्याचे माजी राज्यमंत्री तथा नांदेड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डी पी सावंत ,आंतरराष्ट्रीय कोच श्रीमती हुप्रिष नरिमन डॉ.श्याम पाटील तेलंग उपाध्यक्ष, मुख्य पंच पारिजात नातू , जिल्हा क्रीडा अधिकारी जय ठोंबरे, श्री राजेंद्र हुरणे, श्री रवी कडगे, प्राचार्य डॉ.जी.एन.शिंदे, श्री अशोक सचदेवा, बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव महेश वाखरडकर, रतन गुप्ता सहसचिव तथा निवेदक आणि राज्यभरातून आलेले बहुसंख्य खेळाडू उपस्थित होते.



उद्घाटन प्रसंगी बोलताना खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की , मागील वीस वर्षापासून डी पी सावंत यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवलेली आहे. आगामी काळात निश्चितपणे देशपातळीवरही आपला आगळावेगळा ठसा उमटवत असंख्य खेळाडूंना नवी संधी उपलब्ध करून देईल. खेळाडूंच्या करिअरसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी खासदार चव्हाण यांनी यावेळी सावंत यांचे तोंड भरून कौतुक केले तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून परिश्रम घेणारे संघटनेचे सचिव महेश वाखरडकर यांच्या कार्याचाही यथोचित गौरव केला.




