मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे नेते श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांची ज्येष्ठ पत्रकार श्री गोविंद मुंडकर आणि शिवदास हमंद यांनी घेतलेली मुलाखत आमच्या वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत -संपादक
पत्रकार – मराठवाडा मुक्ती संग्राम बाबत आपण काय सांगाल?
प्रतापराव मराठवाड्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. याबाबत समिती तयार करण्यात आली. याचा उदात्त हेतू होता. या समितीच्या माध्यमातून हुतात्मा स्मारकांचे बळकटीकरण करणे, हुतात्मांच्या कार्याला उजाळा देणे अशा विविध बाबी होत्या. योगायोगाने या समितीचे अध्यक्ष पद माझ्याकडे आलेले होते. याबाबत विविध कार्यक्रम करावयाचे नियोजन होते. ते पूर्ण करण्यासाठी काही कारणामुळे आम्ही कमी पडलो.
पत्रकार – हुतात्मा गोविंदराव पानसरे समाधीच्या ठिकाणी सुविधांच्या बाबत काय सांगाल?
प्रतापराव- हुतात्मा स्मारकांच्या ठिकाणी सुविधा वाढविणे, हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या समाधीला संरक्षित करणे, विविध सुविधा वाढविणे यासह विविध बाबींसाठी शासनाकडे माझा पाठपुरावा राहील.
पत्रकार- अन्य विभागांच्या तुलनेत मराठवाडा मागासला का? याचबरोबर वैधानिक विकास मंडळाची कार्यप्रवणता गरजेचे आहे काय?
प्रतापराव – इतर विभागाच्या तुलनेत आपल्या विभागाला लोकप्रतिनिधित्व मिळालेले नाही, असे म्हणता येणार नाही, आपल्या लोकप्रतिनिधींनी म्हणावे तसे काम केले नाही. हवे तर असे म्हणता येईल. हे मी कोणाला उद्देशून बोलत नाही पण वास्तव व्यक्त झालं पाहिजे. यावर मी अधिक बोललो. तर राजकारण वाटेल. मी कोणाला उद्देशून बोलू इच्छित नाही. शासनाकडून जो निधी मिळाला त्याचा योग्य वापर होतो का ? दर्जेदार कामे होतात का ? आपल्याला इतर विभागातील लोक उदाहरण देऊन सांगतात की, अन्य विभाग बघा आणि आपला मराठवाडा बघा. अन्य विभागात लोकप्रतिनिधी दर्जेदार कामे करत असतात. उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिका येथील कामांची माहिती मला जे मिळाली.
त्या अनुषंगाने असे आहे की, येथे रस्त्याचे काम झाले असेल तो रस्ता दहा वर्षाच्या आत खराब झाला तर त्या गुत्तेदाराला पुन्हा तो रस्ता त्याच पैशात दुरुस्त करून द्यावा लागतो. मुंबईला होतो तर ते नांदेडला का होत नाही? मराठवाड्यात का होत नाही.? लोकप्रतिनिधी दक्ष असल्यामुळे कामे दर्जेदार होतात. रस्त्यावर रस्ते होत नाहीत. राहिला मराठवाडा वैधानिक विकास मंडळ आणि त्याची कार्यप्रवणता. मराठवाडा हा त्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास मंडळ असले पाहिजे. त्याला निधी मोठ्या प्रमाणात दिला पाहिजे. दिलेला निधी दर्जेदार कामे करून विकास साधला पाहिजे असे माझे मत आहे.
पत्रकार – विकासासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि दर्जेदार कामासाठी काय उपाययोजना सांगाल?
प्रतापराव – लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षणाची गरज आहे. माझ्यासहित. विकासासाठी बारामती आणि अन्य विभागाची तुलना करून तेथील नेतृत्वाला जबाबदार धरले जाते. त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा आपल्या कामाच्या बाबतीत कुठे दोष आहे? ते सुधारले पाहिजे. पक्षी राजकारण न आणता विकासाची कामे झाली पाहिजे. आपल्याकडे रस्ता झाला पुन्हा पाईप टाकण्यासाठी खोदला जातो .काही दिवसातच तो उघडला की पुन्हा त्यावर रस्ता केला जातो. नियोजनाचा मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अभाव दिसून येतो. याबाबत जबाबदारी निश्चित केली जात नाही आणि जबाबदारीने काम केलं जात नाही.
पत्रकार-तुम्ही संसद सदस्य असताना केलेली कामे.
प्रतापराव-मी खासदार झाल्यानंतर रेल्वेच्या विविध प्रश्न बाबत अधिक लक्ष दिलेला आहे. आपण पाहाल मुंबई आणि पुणे येथे जाण्यासाठी प्रवाशांच्या वाढलेल्या सोयी. रेल्वेच्या फेऱ्या आणि वाढलेल्या गाड्या याबाबत केलेले प्रयत्न. विमान सेवा सुरू करण्यासाठी केलेला पाठपुरावा. समृद्धी मार्ग याबाबत केलेला पाठपुरावा आणि दिसत असलेली कामे.
पत्रकार- हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्थानकास देण्याबाबत आपले काय मत आहे?
प्रतापराव- हुतात्मा गोविंदराव पानसरे हे जन्माने बदनापूर येथील असले तरी त्यांचे संपूर्ण आयुष्य बिलोली तालुक्यात गेलेले आहे. धर्माबाद येथे त्यांनी वास्तव्याला होते. बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी जवळ असलेल्या अर्जापूर लगतच्या शिवारात रजाकारानी त्यांची हत्या केली. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्थानकास देण्याविषयी कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. माझ्या कार्यालयातून माननीय पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री यांना विनंती पत्र पाठवणार आहे. हुतात्मा गोविंदराव पानसरे आणि मराठवाड्यातील उपेक्षित चळवळी योद्धांच्या विषयावर राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि स्वर्गीय सवंतराव मुंडकर विचारमंच नांदेड यांनी पुढाकार घेतला. कुणीतरी पुढाकार घेण्याची गरज होती. ज्यामुळे या विषयाकडे सर्वांचे लबक्ष वेधल्या गेले. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सुरू असलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा.
लेखक – गोविंद मुंडकर /शिवदास हमंद, नांदेड.