नांदेड| संवेदनशील कवी म्हणून जशी ओळख तशी जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून दासरी यांची ओळख असून, सेवानिवृत्ती देखील त्यांनी साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रात तसेच अन्य क्षेत्रात आणखी जोमाने काम करावे, अशा भावना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केल्या.
काल सायंकाळी बापू दासरी मित्रमंडळ व नातेवाईक यांच्या वतीने बापू दासरी समाज कल्याण अधिकारी यांचा निरोप समारंभ नक्षत्र हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, बापू दासरी यांनी अष्टपैलू व्यक्तीमत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. सरकारी नोकरीत कामाच्या मर्यादा असतात. मात्र आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात देखील भरीव काम करावे.
या समारंभास विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून सहसंचालक डी. डी. देशमुख, निवृत्त उपायुक्त दीपक वडकुते, प्रादेशिक उपायुक्त लातूर, अविनाश देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त लातूर, तेजस माळवतकर, दिलीप राठोड, प्रादेशिक उपसंचालक, लातूर, जलील शेख, प्रादेशिक उपसंचालक, संभाजीनगर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा समाकल्याण अधिकारी जि. प. नांदेड सत्येंद्र आऊलवार, तहसीलदार संजय वरकड, दिवाकर मकरंद, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यासह बापू दासरी यांची भगिनी उमा दासरी पतीवार, राजेंद्र पतीवार, ज्योती दासरी व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सर्व मान्यवरांच्या हस्ते बापू दासरी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बापूच्या कार्यावर आधारित त्यांना मानपत्र देण्यात आले. त्याचे लेखन नीलकंठ पाचंगे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले होते. बापूंच्या सेवा काळातील आठवणींना उजाळा देत नियमांची जाण व वंचितांना केलेल्या मदतीची आठवण सहसंचालक देशमुख यांनी करून दिली. गौरवपर भाषणाचे दरम्यान बापू दासरी यांनी लिहिलेल्या गझलांचे गायन पं. लक्ष्मीकांत रवंदे व त्यांची सुकन्या आसावरी यांनी केले.
मित्रमंडळीच्या समवेत आणि सतत मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून बापूंचा उल्लेख आपली मानसे व कलांगन प्रतिष्ठानचे वतीने रमेश मेगदे यांनी केले तर ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांनी बापूंनी त्यांचे सांस्कृतिक चळवळीत केलेल्या बहुमोल योगदानाचा उल्लेख केला. या प्रसंगी समयोचीत असे भाषण बापूची भगिनी सौ. उमा दासरी हिने केले. लहानपणापासून मोठ्या भावाने दिलेले प्रेम वेळोवेळी केलेली मदत याचा उल्लेख केला. सत्काराला उत्तर देताना बापूंनी स्टेनो टायपिस्ट ते समाजकल्याण अधिकारी प्रवास कसा घडत गेला आणि प्रवासात केलेल्या ज्ञात अज्ञात व्यक्तींचे आभार मानले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अॅड.गजानन पिंपरखेडे यांनी केले.