नांदेड| ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि शाश्वत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींनी सक्षमपणे पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी नांदेड येथे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन व पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता विषय कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी आयएएस अधिकारी अनुष्का शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, वरिष्ठ भुवैज्ञानिक अधिकारी डॉ. भालचंद्र संगमवार, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोजराज आदी मान्यवर उपस्थित होते.
पाणी स्रोतापासून पाणीपुरवठा होईपर्यंत कुठेही पाणी दूषित होणार नाही, याची खात्री ग्रामपंचायतींनी करावी, असे आवाहन करनवाल यांनी केले. पाण्याची गुणवत्ता वर्षातून किमान दोन वेळा तपासणे आवश्यक असून, दूषित पाण्याचे स्रोत कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा योजनांची देखभाल, क्लोरीनचा योग्य वापर आणि त्याची नोंद ठेवणे यासारख्या उपाययोजना राबविण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक नारायण मिसाळ यांनी केले. त्यांनी पाणी गुणवत्ता विषयक केंद्र व राज्य शासनाचे धोरण आणि अंमलबजावणी याविषयी माहिती दिली. कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी जल जीवन मिशन व हर घर जल योजनेची सद्यस्थिती स्पष्ट केली. वरिष्ठ भुवैज्ञानिक अधिकारी डॉ. भालचंद्र संगमवार यांनी प्रयोगशाळेच्या कार्यपद्धती, तपासणीचे स्वरूप आणि पाणी गुणवत्ता परीक्षण याविषयी मार्गदर्शन केले. कपेंद्र देसाई यांनी टीसीएल पावडरचा वापर, पाणी नमुने गोळा करण्याच्या पद्धती, तसेच जैविक व रासायनिक तपासणी, शासन निर्णयाचे वाचन, जिल्हा व तालुक्याची सद्यस्थिती, दुषीत स्त्रोतावर करावयाची कार्यवाही व प्रतिबंधात्मक उपाय योजना, पाणी गुणवत्ते संदर्भीतील संकेत स्थावरील माहिती याबाबत सविस्तर माहिती दिली. तर नल जल मित्र याविषयी सुशील मानवतकर, महाजल समाधान तक्रार प्रणाली बाबत कृष्णा गोपीवार तर निधी वितरण प्रणालीबाबत निकिशा इंगोले यांनी माहिती दिली. यावेळी प्रयोगशाळ तंत्रज्ञ यांनी रासायनिक व जैविक फिल्ड टेस्ट किट्सचे प्रात्यक्षिक करुन दाखवीले.
या कार्यशाळेत गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उपअभियंता, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी आरोग्य, तालुका सुपरवायझर व कनिष्ठ अभियंता यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखाधिकारी शंकर बाचेवार, कार्यालयीन अधीक्षक अल्केश शिरशेटवार, कपेंद्र देसाई, निकिता इंगोले, सुशील मानवतकर, कृष्णा गोपीवार, चैतन्य तांदूळवाडीकर, विशाल कदम, महेंद्र वाठोरे, डी.डी. पवार, नागेश नाईवाडे, श्रीनिवास क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे तर उपस्थितांचे आभार चैतन्य तांदुळवाडीकर यांनी मानले.