नांदेड, अनिल मादसवार| नांदेडचे विद्यमान खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे 26 ऑगस्टला पहाटे हैद्राबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड मतदार संघातून ते विजयी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वस्थामुळे प्रथम नांदेड येथे व नंतर हैद्राबाद येथे उपचार घेत होते. मात्र 26 ऑगस्ट रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांनी दुखवटा व्यक्त केला आहे. राज्य शासनाने त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात घेण्याचे निर्देश नांदेड जिल्हा व पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
वसंतराव चव्हाण यांचा परिचय
खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या वडीलाचे नाव कै. बळवंतराव अमृतराव चव्हाण होते. त्यांचा जन्म दिनांक 15 ऑगस्ट 1954 रोजी झाला होता. त्यांचे जन्मस्थळ नांदेड जिल्हयातील नायगाव (बा.) आहे. त्यांचे शिक्षण बीकॉम (दुसरे वर्ष) असे होते.
राजकीय कार्य
स्व. वसंतराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य सरपंच अशी केली आहे. सन 1978 ते 2002 पर्यत सलग 24 वर्ष ते नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते. बिलोली सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते. सन 1990-95 या काळात जिल्हा परिषद सदस्य नांदेड. सन 2002 मध्ये जिल्हा परिषदेला दुसऱ्यांदा निवड झाली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे नांदेड, सन 2002-2008 विधान परिषद सदस्य होते. 2009-2014 या काळात ते राज्याच्या विधानसभेमध्ये विधानसभा सदस्य (अपक्ष) होते. त्यांनी रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य म्हणूनही पद भूषविले. संसदीय कामकाज पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी युरोपचा अभ्यास दौरा केला.
पुन्हा एकदा 2014-2019 या काळात काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ते निवडून आले. सदस्य अंदाज समिती महाराष्ट्र राज्य. सन 2016-2022 सभापती कृ.ऊ.बा समिती नायगांव, सन 2021-2023 चेअरमन, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली आणि 29 फेब्रुवारी 2024 पासून मुख्य समन्वयक नांदेड ग्रामीण कॉग्रेसची जबाबदारी त्यांनी घेतली. नायगाव तालुका निर्मितीचे ते शिल्पकार आहेत. 4 जून 2024 पासून ते कॉग्रेस पक्षाकडून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. खासदार म्हणून त्यांचे कामकाज नुकतेच सुरू झाले होते. राजकीय कारकीर्दीसोबतच त्यांचे सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यातही खूप मोठा सहभाग होता.