नांदेड| अवघ्या सात दिवसावर बहीण भावाचा रक्षाबंधन सण येऊन ठेपला असतांनाच बहिणीसह अन्य एका महिलेला घेऊन जाणाऱ्या भावाच्या दुचाकीं आणि क्रुझर जीपची समोरासमोर धडक झाल्याची घटना दिनांक १३ रोजी दुपारी हदगाव तालुक्यातील मौजे बामणी फाटा आणि शिबदरा जवळ घडली आहे. या दुर्घटनेत भाऊ खंडू डोके वय २५ वर्ष याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची बहीण अरुणा वागतकर वय २८ वर्ष हीचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बहिणीची ननंद असलेली दुसरी महिला मृत्यूशी झुंज देत असून, या दुर्दैवी घटनेने हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी भोकर तालुक्यातील सम्दरवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भोकर तालुक्यातील सम्दरवाडी येथील खंडू डोके वय २५ वर्ष हा युवक वारंगा परिसरातील आयुर्वेदिक वैद्याकडे मुळव्याधीचे औषध घेण्यासाठी आपली हिमायतनगर तालुक्यातील डोंगरदऱ्यात असलेल्या मौजे वाळकेवाडी येथील विवाहित बहिण व बहिणीच्या ननंदेला घेऊन दि. १२ श्रावण सोमवारी गेला होता. आज मंगळवार दि. १३ ऑगस्ट रोज खंडू आपली बहिण व बहिणीची ननंद यांना घेऊन दुचाकी क्रमांक एम एस २६ ए ए ७८४३ वरून गावाकडे येत होता.
दरम्यान दुचाकी बामणी फाटा आणि शिबदरा डाकबंगला जवळ आली असता एका बाजूने रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनासाठी एकच बाजू होती. समोरुन येणारी क्रुझर जीप क्र. एम एच २० एक ०६८७ या दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात मोटर सायकल चालक खंडू मारुती डोके राहणार सम्दरवाडी तालुका भोकर हा जागीच ठार झाला. तर अरुणाबाई परमेश्वर वागतकर वय २८ राहणार व भारतीबाई रामदास गोरे वय ३० रा. वाळकेवाडी राहणार हिमायतनगर या दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या.
जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मोटरसायकल चालक खंडू डोके याची बहिण अरुणाबाई वागतकर या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर त्याच्या बहिणीची ननंद भारती गोरे ही गंभीर जखमी आहे. या अपघाताची माहिती मिळताच मनाठा पोलीस स्टेशनचे ठाणे प्रमुख उमाकांत पुणे व त्यांचे सर्व सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिका बोलाऊन तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. यावेळी यांच्यासोबाबत पोलीस उपनिरीक्षक कांबळे, दत्ता वडजे, नरवाडे, गिरी यांची उपस्थिती होती.
नागपूर नांदेड तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या आठ वर्षापासून चालू आहे. ते अजूनही अर्धवट अवस्थेत असून, या संदर्भात नांदेड न्यूज लाइव्हने अनेकदा वृत्त सुरक्षित करून या कामाला गती मिळावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेच्या वतीने केली होती. तरीही गेंड्याची कातडी पांघरलेल्या ठेकेदारच्या मनमानी कारभार आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी बांधकाम साहित्य व मशिनरी उभ्या करून ठेवलेल्या. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे वारंगा ते हदगाव दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर दररोज एक ना एक अपघात होत असून, असे किती जणांचे बाली घेतल्यानंतर या रस्त्याचे काम पूर्ण होणार असा सवाल आता जनता विचारीत आहे.