नांदेडच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी जी दंडेली केली ती अत्यंत संतापजनक, गणेश भक्तावर अन्यायकारक होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्याचा हवाला देत पोलिसांनी जी दडपशाही केली ते पाहून हे पोलिस की दंगलखोर असा सर्वसामान्यांना प्रश्न पडावा इतपत पोलिसांची वागणूक आक्षेपार्ह होती. निझामशाहीतही निझामाच्या पोलिसांनी गणेश मिरवणुकीत अशी भूमिका कधी घेतली नसेल.
एक गोष्ट शंभर टक्के सत्य आहे की, सध्याची सामाजिक परिस्थिती स्फोटक आहे. पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आहे. निवडणुका तोंडावर असल्याने गणेश मिवरणुकीत कोण कसा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल याचाही नेम नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० वाजेनंतर वाद्य वाजविण्यास बंदी घातली आहे हेही खरे आहे. परंतु त्याचबरोबर अपवादात्मक परिस्थितीत काही कार्यक्रमांना रात्री १२ वाजेपर्यत सुट देता येते हेही खरे आहे. यापूर्वी गृहखात्याने अशा परवानग्या दिल्या आहेत.
महाराष्ट्रात गणेश विसर्जन हा सोहळा सर्वाच्या आस्थेचा, श्रद्धेचा, आनंदाचा, उत्साहाचा सोहळा आहे. त्यामुळे ती मिरवणूक रात्री १२ पर्यत चालली तर कायद्याचे फार मोठे उल्लंघन होते असे नाही. मुंबई, पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका २४ ते ३० तास चालतात. मग तिथे पोलिस लाठ्या चालवून गणेश मूर्तींना ढकलत पुढे नेतात का? मुंबई, पुणे महाराष्ट्राच्या बाहेर आहे की, त्यांचे सर्वोच्च न्यायालय वेगळे आहे? नांदेड महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? संपूर्ण देशात कायदा एकच आहे तर वेगळा न्याय का लावला जातो? पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत दहा वाजले की, ढोल ताशे वाजविणा-यांना आणि नाचणा-या गणेश भक्तांना अक्षरश: बदडून काढले.
नवयुवक गणेश मंडळातील सालासारचे भजनी मंडळ हे नांदेड शहरातील प्रत्येक मिरवणुकीत लोकांच्या आकर्षणाच्या विषय असते. मारवाडी धर्म शाळेजवळ पोलिसांनी त्यांच्या ट्रकवर काठ्या आपटत बँजो वाजविणा-याला मारले व त्यांचे भजन बंद पाडले. महावीर चौकात काँग्रेसचे आमदार यांनी पहिल्यांदाच स्टेज टाकून गणेश मंडळातील अध्यक्षांचा सत्कार केला. ते मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करीत असताना स्टेजच्या खाली पोलिस गणेश भक्तांवर लाठ्या चालवित होते. वजिराबाद हनुमान मंदिरासमोर पोलिसांनी लाठीचार्च केला. त्यावेळी स्वतः पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार तिथे होते. त्यानंतर वजिराबाद चौक व नंतर महावीर चौक अशा तीन ठिकाणी पोलिसांनी बेताल लाठीहल्ला केला. माझी माहिती अशी आहे की, गणेश विसर्जन मिवरणुकीसाठी रात्री १२ वाजेपर्यत सुट होती.
जर रात्री बारा वाजेपर्यत सुट होती तर पोलिसांनी रात्री १० वाजता अशी दंडेली का केली? पोलिसांच्या अशा भूमिकेमुळे नांदेडला गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरु आहे की गणपतीची शवयात्रा सुरु आहे असा प्रश्न पाहणाःयांना पडला एवढी निरव शांतता होती. हे सर्व पाहून गणेश भक्तांत संतापाची लाट उसळली. शेवटी आ. मोहन हंबर्डे यांच्या स्टेजवर पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांना वाद्य हळू वाजवा व हळू हळू पुढे चाला असे जाहीर करावे लागले. सुदैवाने पोलिसांच्या अशा भूमिकेमुळे गणेश भक्तांचा संयम सुटला नाही आणि काही अनुचित घटना घडली नाही. अन्यथा नांदेडच्या दंगलीला पोलिसच जबाबदारा ठरले असते.
नांदेडची मिरवणूक पाहण्यासाठी आजुबाजुच्या खेड्यापाड्यातील लाखो लोक शहरात येतात. अनेक नागरिक प्रसादाचे स्टाँल लावून लाखो गणेश भक्तांना प्रसादाचे वाटप करतात. नवजात अर्भकापासून वयोवृद्धांपर्यत लक्षावधी लोक मिरवणूक पाहण्यासाठी येतात. त्यांच्यातील उत्साह ओसंडून वाहणारा असतो. परंतु नांदेड पोलिसांच्या अत्यंत आक्षेपार्ह वर्तणुकीमुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण तर पडलेच परंतु नांदेड पोलिसांची प्रतिमाही डागाळून गेली. विशेष म्हणजे नांदेड शहराची खडान खडा माहिती असलेले पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप नुकतेच येथे रुजू झालेले असताना पोलिसांनी असे बेताल वर्तन करावे हे धक्कादायक आहे.
नांदेडचे पोलिस कायद्याचे एवढेच रक्षक आहेत तर अवैध वाळू उपसा, जुगार अड्डे, मटका यांच्यावरील कारवाईबाबत त्यांचे हात का बांधलेले असतात? बाकी सगळे सोडा नांदेड शहराची वाहतूक पोलिसांना गेल्या अनेक वर्षापासून सुरळित करता आली नाही. पोलिसांनी गुटका बंदी केली. काय परिणाम झाला त्याचा? पाच रुपयाला मिळणारी गुटक्याची पुडी दहा रुपयाला झाली. पानठेलेवाले सांगत आहेत, पोलिसांना हफ्ते द्यावे लागतात.
माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न आहे. राज्यात कायदा एवढ्या कठोरपणे पाळला जात असेल तर अंतरवालीत सराटीत यापूर्वी मनोज जरांगे परवानगी दिली नसतानाही उपोषणाला बसले त्यावेळी पोलिसांनी त्यांचा तंबू उखडून का टाकला नाही? तसे केले तर मराठा मतदार नाराज होईल आणि त्याचा निवडणुकीत फटका बसेल अशी भिती होती ना? मग नांदेडच्या मिरवणुकीतील गणेश भक्तही मतदार आहेत. लाखोंच्या संख्येने आहेत. मग त्यांच्यावरच अशा पद्धतीने लाठ्या चालविल्या तर ते तुम्हाला कसे मतदान करतील? नांदेडचे दोन खासदार आज भाजपचे आहेत. त्यात अशोक चव्हाण महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना शासन, प्रशासन याचा दीर्घ अनुभव आहे. दुसरे खासदार अजित गोपछडेही सुशिक्षित व वैद्यकीय व्यवसायातले आहेत. आमदार मोहन हंबर्डे हे तर स्वतः घटनास्थळावरच होते. या लोकप्रतिनिधींनी या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. ते जर घेणार नसतील मतदारांनी त्यांची दखल घेतली पाहिजेत.
नांदेडच्या पोलिस अधिका-यांचे मला अजून एक समजत नाही. ते स्वतः राष्ट्रपती व पंतप्रधानाच्या भोवती जसे सुरक्षेचे कडे असते तसे कडे करुन फिरतात. यांच्यावर जिल्ह्याच्या संरक्षणाची जबाबदारी. ते स्वतः जर असे भित असतील तर हे जिल्ह्याचे व सर्वसामान्य नागरिकांचे काय रक्षण करणार? आणि त्यांच्या भोवतीचे कमांडो समोर येणा-याला अशा पद्धतीने ढकला ढकली करतात की, त्याने रस्त्यावर येऊन फार मोठा गुन्हा केला. सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीद गणेश मिरवणुकीत पोलिस अधिक्षकापासून सर्वजण विसरले. याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. मी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात १२ वर्षे पत्रकारिता केली. तिथे पोलिस कसे जिवावर उदार होऊन काम करतात हे मी पाहिले आहे. त्यामुळे सहसा मी पोलिस यंत्रणेविरुद्ध कधी लिहित नाही. परंतु नांदेड पोलिसांची गणेश मिरवणुकीतील भूमिका खरोखरच संतापजनक, बेताल व गणेश भक्तांवर अन्याय करणारी होती. त्यामुळे हे लिहिल्याशिवाय गत्यंतरही नव्हते. याचे कारण मिरवणुकीतील एकाही गणेश मंडळाने नियमांचे उल्लंघन केले नव्हते. एकाही मंडळाने डीजे लावला नाही, लेझर लाईट लावले नाही. मग नियमाने चालणा-या मिवरणुकीवर पोलिसांनी लाठ्या का चालविल्या? यापुढे असे प्रकार होऊ नयेत.
लेखक … विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. १८.९.२०२४