बिलोली/नांदेड। नांदेड जिल्ह्यालील बीलोली तालुक्यातील मौजे अंजनी येथील गोविंद तुळशीराम गंधाफुले यांच्यावर दिनांक १६ जुलै २०२४ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. हत्येचा प्रयत्न प्रकरणातील दोन आरोपींचा नियमीत जामीन अर्ज बिलोली जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. व्ही. बी बोहरा यांनी शुक्रवारी फेटाळला.
मौजे. अंजनी ता. बिलोली जि. नांदेड येथील गोविंद तुळशीराम गंधाफुले यांच्यावर दिनांक १६ जुलै २०२४ रोजी प्राणघातक हल्ला झालेला होता. त्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादेवरून चार जणांविरूध्द पोलिस ठाणे बिलोली येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११८(२), ११९(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंद क. १६३/२०२४ हा दाखल करण्यात आला होता व त्यानंतर सदर गुन्हयात भारतीय न्याय संहिता चे कलम ११९ (२) व ६१ (२) हे नव्याने समाविष्ठ करण्यात आले होते. त्यावरून ३ आरोपींना दिनांक १८ जुलै रोजी तर एकास दिनांक १९ जुलै रोजी अटक करण्यात आली. सध्या चारही आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असुन गुन्हयाचा तपास चालु आहे.
दरम्यान सदर गुन्हयातील २ आरोपींनी दिनांक १ ऑगष्ट रोजी अॅड. एम. एम. आरळीकर यांच्यामार्फत बिलोली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात नियमीत जामीन अर्ज क. १०९/२०२४ दाखल केला होता. सदर प्रकरणात विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. व्ही. बी बोहरा यांच्या न्यायालयात दिनांक ९ ऑगष्ट रोजी अंतीम सुनावणी होवुन अभिलेखावरील प्रथमदर्शी पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राहय धरत आरोपींचा नियमीत जामीन अर्ज फेटाळण्यात आला. सदरच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सायंकाळी ऊशीरा आदेश झाल्यामुळे सविस्तर आदेश हाती आलेला नाही.
याप्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. एम. एम आरळीकर यांनी बाजु मांडली तर सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील श्री. कुंडलवाडीकर यांनी काम पाहीले. तसेच सदर प्रकरणात फिर्यादी यांच्यातर्फे अॅड. आय. सी तळणीकर यांनी सरकारी पक्षास सहाय्य केले तर त्यांना के. जी देशमुख व झेड. एम देशमुख यांनी सहकार्य केले.
जखमी फिर्यादीची अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी रूग्णालयात जावुन घेतली होती भेट. दरम्यान या घटनेनंतर प्रकरणातील जखमी फिर्यादी गोविंद तुळशीराम गंधाफुले व त्यांच्या कुटुंबियांची अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २० जुलै रोजी विष्णुपुरी, नांदेड येथील शासकिय रूग्णालय येथे जावुन भेट घेतली होती.