नांदेड| राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सभ्यता, शिस्त, प्रामाणिकता, कौशल्य इत्यादी चांगली मुले जोपासली जातात. जे की जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेवक आणि स्वयंसेविका जीवनात पुढे यशस्वी होतात असे मत विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
ते दि. २६ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शनपर बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष कार्यसन अधिकारी डॉ. सुशील शिंदे, मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी रमेश देवकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नरेंद्र चव्हाण, डॉ. सुरेखा भोसले, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे. प्रा. रवींद्र खडकीकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा विभागाचे संचालक डॉ, भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय पुणे, युवा कार्य व क्रीडा कार्यालय भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन पूर्व निवड चाचणी शिबिराचा आज उद्घाटन समारंभ कार्यक्रम पार पडला.
पुढे डॉ. चासकर म्हणाले राष्ट्रीय सेवा योजनेतील प्रत्येक स्वयंसेवक व स्वयंसेविकेचे राज्य किंवा राष्ट्रीय परेड साठी निवड होण्याचे स्वप्न असते. तुमच्या पैकी ८६ स्वयंसेवकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वांनीच आपले कौशल्य दाखविण्याची ही वेळ आहे. पुढे ते स्वच्छते बाबतीत बोलताना ते म्हणाले, पाश्चात्त्य देशात अगदी बालपणापासून स्वच्छतेची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली जाते. पुढे त्यांना स्वच्छतेबद्दल धडे देण्याची गरज नाही त्यामुळे ते त्यांचे घर आणि देश सुंदर ठेवतात. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकही स्वच्छतेचे दूत आहेत. त्यांनी आपला भारत देश सुंदर कसा होईल या बाबतीत जागरूक असले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रमुख पाहुणे डॉ. सुशील शिंदे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये स्वयंसेवक केवळ स्वच्छता अभियानासाठी नसतात. तर ते राष्ट्रीय पथसंचलन सुद्धा चांगल्या पद्धतीने करत असतात. म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वतीने असे शिबीर घेतले जातात. यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते.
यावेळी दुसरे प्रमुख पाहुणे डॉ. देवकर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपल्या जवळील चांगल्यात चांगल्या परेडसाठी कौशल्य देण्याची आणि दाखविण्याची ही वेळ आहे. प्रत्येकांने स्वंयशिस्त पाळून आपले कार्य यशस्वी केले पाहिजे. यावेळी मागीलवर्षी दिल्ली येथील परेडसाठी निवड झालेले विद्यार्थी विष्णू जाधव आणि कु. भाग्यश्री गैनवाड यांचा सन्मान कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला.
प. पूज्य स्वामीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर रोपट्यास पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुणा शुक्ला यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अमोल काळे यांनी केले.
सदरील प्रजासत्ताक पूर्व संचलन शिबिरासाठी महाराष्ट्रातील ५१ विद्यापीठातील कृषी, तंत्रज्ञान, अकृषी, आरोग्य, पशुवैद्यकीय, महिला विद्यापीठ अशा विविध महाराष्ट्रातील विद्यापीठातून १६५ मुले स्वयंसेवक व १७४ मुली स्वयंसेविका तसेच या शिबारासाठी ९ पुरुष व १० महिला यांचा संघ व्यवस्थापक म्हणून सहभागी आहेत. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी परिश्रम घेत आहेत.