नांदेड,अनिल मादसवार। महाराष्ट्र शासन,लागवड अधिकारी, सामाजिक वनीकरण कंधार स्थित लोहा कार्यालयाचा भोंगळा कारभार चालू असून, कर्मचारी व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने यांचेवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघमारे यांनी एका निवेदनातुन दिला आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सामाजिक वनीकरण, कंधार स्थित लोहा कार्यालयात भोंगळा कारभार चालविला जातो आहे. कर्मचारी व अधिकारी हे कागदोपत्री मीटिंग, दौरे, दाखवत शिपायाच्या हवाली कार्यालय सोडुन अनेक दिवस,महिने अनुपस्थित राहून या कार्यालयाचा कारभार चालवतात.
त्यामुळे शेतकरी लाभार्थी व्रक्ष लागवडीसाठी कार्यालयात नेहमी चकरा मारल्या तरी कर्मचारी व अधिकारी यांचे दर्शन होत नाही. भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असता व्यस्त किंवा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समजते, सामाजिक वनीकरण कार्यालय नांदेड अधिकारी यांची भेट घेतली असता अनुपस्थित कर्मचारी यांची पाठराखण केली जाते. मंगळवारी किंवा बुधवारी कार्यालय लोह्याला जा भेट होईल आसे बोलले जाते. या व्यतिरिक्त कोनतिही कार्यवाही करण्यात येत नाही.
आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघमारे यांनी सांगितले की, या संदर्भात लवकरच सामाजिक वनीकरण मंत्री महोदयांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या या कारभारामुळे सदरील कर्मचारी व अधिकारी यांचे वर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी करनार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ही बाब लक्षात घेता, प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाने लोहा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील भोंगळ कारभाराची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा बेमुदत अमरण उपोषण केले जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघमारे यांनी कळवले आहे. यावर कधी व कोणती कार्यवाही…? केली जाईल याचे तालुक्यातील ग्रामस्थ शेतकरी, लाभार्थी यांचे लक्ष लागले आहे.