बिलोली/नांदेड| महाराष्ट्रात अवैद्य सावकारीच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने कंबर कसली असून, नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरांसह ग्रामीण परिक्षेत्रात बेकायदेशीर रित्या व्याजाने पैसे देणाऱ्यांवर तसेच सावकारी करणाऱ्या दलालांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ज्या कुणावरही अश्या प्रकारे अन्याय झाला असेल तर संबंधितांनी बिलोली येथील सहाय्यक निबंधक कार्यालयास सम्पर्क साधून तक्रार द्यावी असे आवाहन सहाय्यक निबंधक सुनील गन्लेवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र राज्यातल्या बहुतांश शहरी व ग्रामीण परिक्षेत्रात बोकाळलेल्या बेकायदेशीर व्याजबटी – सावकारी करणाऱ्या दलालांचा समुळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कंबर कसली असुन, या दलालांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ सुधारीत कायद्या अंतर्गत संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आले आहे.
सदरील कायद्याच्या अनुषंगाने, व्याजाने पैसे देत सावकारांनी शेतकरी, व्यापारी, लघु उद्योजक, शेतमजूर यांसह समाजातील विविध घटकांकडुन मोठ्या प्रमाणावर अवास्तव दराने व्याज वसूल करणे, मालमत्ता हडप करणे, दमदाटी करणे, उपद्रव, गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमकी, मारहाण आदी गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अश्या प्रकारचा त्रास कोणी सावकार, दलाल मंडळी देत असतील तर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गांधीनगर, बिलोली. जि.नांदेड येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय ज्यांना कर्ज पाहिजे असेल विशेषतः शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी संस्था, परवानाधारक सावकार यांच्या कडुनच व्याज दर निश्चित करुन घेऊनच कर्ज मागणी करावेत. असे आवाहन देखील करण्यात आले आहे. बेकायदेशीर व्याजबटी – सावकारी करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या सावकारी अध्यादेश २०१४ अन्वे बिलोली शहरांसह ग्रामीण परिक्षेत्रातील बेकायदेशीर व्याजबटी -सावकारी करणाऱ्यांसह भिशीचा धंदा, समुह भिशी टाकणाऱ्यांना देखील लगाम बसेल. असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.