हिमायतनगर,अनिल मादसवार| अंत्योदय लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या साखरेचे वाटप माहे एप्रील 2024 महीन्यात केले नसल्याच्या असंख्य तक्रारी झाल्या आहेत. असे असताना साखरेचा काळा बाजार करण्याच्या उद्देशाने हिमायतनगर येथील पाण्याच्या टाकी जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर शेकडो रिकामी पॉकिटे फेकून दिल्याचा प्रकार उजेडात आला होता. याबाबतचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित करताच काळा बाजार करणाऱ्यां दुकानदाराकडून फेकलेली पॉकिट रात्रीतून उचलून नेऊन सारवासारव करण्यात प्रयन्त झाला आहे. हा प्रकार कोणत्या दुकानदाराने केला…? याची चौकशी मात्र गुलदस्त्यात असल्याने हिमायतनगर तहसील पुरवठा विभागाचे अधिकारी या प्रकरणात सामील आहेत कि काय..? अशी शंका वंचित असलेल्या अंत्योदय लाभार्थ्यामधून व्यक्त केली जात आहे.
हिमायतनगर तालुक्यातील अंत्योदय लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून साखरेचे नियमित वितरण केली जात नाही असे सांगितले जाते आहे. महाराष्ट्र शासनाकडून एप्रिल महिन्यात साखर वाटपाला मान्यता देऊन साखरेचा कोठा देखील वितरणासाठी पाठविण्यात आला होता. मात्र एप्रिल महिन्यात बहुतांश दुकानदारांनी अंत्योदय लाभार्थ्यांना साखर वितरित केली नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. धान्य नियमित दिले जात असताना साखर का..? दिली जात नाही, असा प्रश्न देखील अंत्योदय लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. शहर व ग्रामीण भागातील अनेक दुकादाराने साखर पुरवठा विभागाकडून मिळाली नसल्याचे सांगून साखर वाटपच केली नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी एप्रिल महिन्यातील साखरेच्या लाभापासून वंचित आहेत.
वितरण व्यवस्थेचा कारभार ऑनलाईन झालेला असताना देखील काही रेशन दुकानदार संबंधित लाभार्थ्याच्या पावतीमध्ये साखरेची नोंद करून, साखर मात्र मुद्दाम देत नाहीत. असे एप्रिल 2024 महिन्यात साखरेच्या लाभापासून वंचित असलेल्या अनेक लाभधारकांनी उघडपने बोलून दाखविले आहे. याचं दरम्यान हिमायतनगर शहराजवळील पाण्याच्या टाकी परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर शेकडो रिकामे पॉकेट टाकून दिल्याच्या प्रकारानंतर साखरेचा काळा बाजार होत असल्याच्या चर्चेला वाव मिळत आहे. अंत्योदय लाभार्थ्यांच्या नावाने आलेले साखरेचे पॉकेट फोडून कोणत्या दुकानदाराने याची काळया बाजारात विक्री केली. याबाबत लाभधारकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. सदरील साखरेचे पॉकेट कोणत्या दुकानदाराने त्यातील साखर काढून घेऊन फेकून दिले याची चौकशी करून त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी साखरेपासून वंचित लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
या बाबतचे वृत्त नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित केल्यानंतर कार्यवाहीच्या भीतीने हि शेकडो रिकामे पॉकेट फेकून देणाऱ्या संबंधिताने कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील पॉकिट गायब करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करून कार्यवाहीपासून वाचण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे आता खरोखर हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानदार प्रामाणिकपणे धान्य व साखरेचे वितरण करत असतील का..? याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे. या गंभीर बाबीची जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी गांभीर्याने नोंद घेऊन हिमायतनगर पुरवठा विभागाला एप्रिल महिन्यात पाठविण्यात आलेल्या साखरेच्या नियतन मालाची आणि वितरण केलेल्या साखरेच्या पॉकिटची आणि तसेच वितरित केल्या जाणाऱ्या स्वस्त धान्याची तपासणी करून दोषी आढळलेल्या अधिकारी व संबंधित रेशन दुकानदारावर कार्यवाहीचा बडगा उगारावा अशी मागणी लाभार्थ्यामधून केली जात आहे.