अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या अनुभवी लेखन शैलीतून रोमांचकारी असणारी अमरनाथ यात्रेचा दररोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. – संपादक…..
अमरनाथ गुहेतून भाग -१ (लेखक: धर्भभूषण ॲड.दिलीप ठाकूर)
कोरोनाचा काळ वगळता सलग २२ वर्षापासून अविरत अखंड चालू असलेली २३ वी अमरनाथ यात्रा यावर्षी देखील काढण्याचे जेव्हा निश्चित झाले. त्याची माहिती सर्वांना वृत्तपत्रातून व सोशल मीडियातून दिली. अवघ्या सात दिवसात कोटा पूर्ण झाला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एक महिना भाजपच्या प्रचार कार्यालयात मुक्काम ठोकल्यामुळे रजिस्ट्रेशन करण्यात अडचण येत होती. प्रत्येकाचे मेडिकल करणे, त्यानंतर ते मेडिकल घेऊन पंजाब नॅशनल बँकेत जाऊन यात्रा परची काढणे. विशेष म्हणजे यात्रा परची काढताना दोन वर्षापासून प्रत्येक यात्रेकरूंनी प्रत्यक्ष हजर राहून थम्ब देणे अनिवार्य करण्यात आले आहे.पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग सापडतोच. छोटा भाऊ राजेशसिंह याने संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सिव्हिल सर्जन डॉ. भोसीकर साहेब, त्यांचे स्विय सहाय्यक शिंदे आणि सेवक शंकर यांनी मोलाचे सहकार्य केले. पंजाब नॅशनल बँकेतील शिवराज या माझ्या मित्राने माझी अडचण ओळखून मदतीचा हात पुढे केला. वारंवार कनेक्टिव्हिटी चा अडथळा येत असताना देखील शिवराजने चिकाटी सोडली नसल्यामुळे शेवटी एकदा रजिस्ट्रेशनचा अध्याय संपला.
अमरनाथ यात्रेला दरवर्षी भारतातून लाखो भाविक जातात. ही यात्रा अतिशय खडतर आहे. त्यामुळे यात्रेकरूंची शारीरिक व मानसिक तयारी करून घेणे आवश्यक असते. संपूर्ण भारतात नांदेडच्या अमरनाथ यात्री संघासारखी पूर्वतयारी कुठेही होत नाही.खडतर असलेल्या अमरनाथ यात्रा सुरळीत व्हावी म्हणून दोन महिने आधी पासून चालण्याचा सराव करण्यात येतो. 45 मिनिट वॉकिंग, पंधरा मिनिट प्राणायाम असा दररोजचा व्यायाम असतो. सोमवार सोडून दररोज सकाळी सहा वाजता यात्रेकरू श्रीराम सेतू, गोवर्धन घाट येथे जमतात. एक किलो मीटर अंतराच्या या पुलावर दोन तर कोणी तीन चकरा मारतात.
साधारणता सहा किलोमीटरचा अंतर दररोज पूर्ण करण्यात येते. त्यानंतर प्राणायाम मध्ये भसरिका, दीर्घ लहरीचे ओंकार, लघु लहरीचे ओंकार, कपालभाती, अनुलोम विलोम,भ्रामरी चा सराव करण्यात येतो. त्यानंतर सेल्फ हिप्नोतिझम मध्ये स्वयं सूचना देण्यात येतात. हळूहळू टाळ्यांची सुरुवात करून नंतर एकदम जोरात टाळ्या वाजवून सर्वजण तीनदा मनसोक्त हसतात. उपस्थित्यापैकी दररोज एक जण विनोद सांगतो. आणि त्यानंतर मी एक विनोद सांगत असतो. मी एखाद्या दिवस गैरहजर राहिलो तर योग गुरु ची जबाबदारी रामेश्वर वाघमारे हे चोख बजावतात. काहीजण असे सांगतात की, आम्ही आमच्या घराजवळ दररोज चालतो त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही. माझे म्हणणे असे असते की, एकदा इथे येऊन पहा आणि जर तुम्हाला खरोखरच इफेक्टिव्ह वाटत असेल तर कंटिन्यू करा. सहज म्हणून वाकिंग ला आलेला यात्रेकरू रेगुलर कधी झाला आहे त्याला सुद्धा कळत नाही. सर्वांचा एकमेकांशी दररोज संवाद होत असल्यामुळे यात्रेच्या आधीच एक कुटुंब तयार होते.
दरवर्षी चालण्याची भव्य स्पर्धा घेण्यात येते. योग दिन साजरा करण्यात येतो. रत्नेश्वरी पाऊस दिंडी घेण्यात येते. यामुळे यात्रेकरूंची किती तयारी झाली याची चाचपणी होते. रेल्वे तिकीट काढण्याचे देखील एक दिव्यच आहे. वेटिंग चालू झाली की, ब्रेक जर्नी तिकीट काढणे, तेही बंद झाले की आधीच्या कोट्यातून तिकिटे काढावी लागतात. काही तिकीटे तात्काळ ही काढावी लागतात. काही प्रवासी विमानाने येत असतात त्यांना देखील योग्य मार्गदर्शन करावे लागते. हे सर्व करत असताना दिवस कधी संपतात हे कळत देखील नाही.
प्रत्यक्ष यात्रा सुरू होण्याच्या शेवटचा आठवडा अतिशय धावपळीचा असतो. या यात्रेत यात्रेकरू कडून जेवणाचे शुल्क आकारले जात नाही.माझे अनेक मित्र जेवणाची, नाश्त्याची व्यवस्था करतात. त्यांच्याशी संपर्क साधावा लागतो. यावर्षी यात्रेमध्ये अन्नदान करण्यासाठी नवनाथ सोनवणे,नागेश शेट्टी,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,नारायण गवळी, रेखा भताने, वंदना सुरेश त्रिमुखे,श्याम हुरणे, गोरखनाथ सोनवणे,अमोल गोळे,प्रदीप शुक्ला,प्रताप फोजदार , ज्ञानोबा जोगदंड ,सरदार जागीरसिंघ,सरदार कुलदीपसिंघ, श्याम हुरणे,श्रीपतराव नेवळे पाटील, डॉ.अजयसिंग ठाकूर ,चंद्रकांत कदम,मनोज शर्मा ,स्नेहलता जायसवाल,द्वारकादास अग्रवाल, प्रियंका गजानन मामिडवार, वसंतराव कल्याणकर,आनंद साताळे,व्यंकटराव वायगावकर,गंगाधर श्रीराम मामडे , सुरेखा रहाटीकर, जगन्नाथ सोनवणे यांनी संमती दिली.
गेल्या २२ वर्षापासून यात्रा नियमित निघत असल्यामुळे हॉटेल वाल्यांशी, बसवाल्यांची चांगला परिचय झालेला आहे. दरवर्षी त्यामध्ये कशी सुधारणा करता येते याची मी काळजी घेत असतो. टी-शर्ट, रेनकोट, कॅप चा दरवर्षी कलर बदलत असतो. यावेळी आकाशी कलर निवडला.बसमधील दररोज बदलणारी आसन व्यवस्थेचा चार्ट तयार करणे,आय कार्ड तयार करणे, ट्रॉफी तयार करणे, लगेज ला लावायचे बॅचेस तयार करणे, बॅनर बनवणे असे किरकोळ वाटणारे कामे देखील बराच वेळ खातात. सर्व गोष्टी काळजीपूर्वक करावे लागतात. यासाठी माझा जुना सहकारी बलभीम पत्की व त्याची पत्नी मृदुला यांची मोलाची साथ लाभली.सर्व तिकिटे, यात्रा परची व्यवस्थित आहे की नाही याची पुन्हा एकदा खात्री केली.उद्या शुक्रवारी सकाळी प्रत्यक्ष यात्रेला सुरुवात होणार असल्यामुळे लवकर उठायचे असा निश्चय करून झोपेच्या अधीन झालो. (क्रमशः)
[…] […]