श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री.आनंद दत्त धाम आश्रमाकडून नवरात्रोत्सव काळात भक्तगण,भाविक, पोलीस कर्मचारी आणि हजारो लोकांना दररोज अन्नदानाचा लाभ दिला जात आहे. आनंद दत्तधाम आश्रमाकडून आजपर्यंत अनेक उपक्रम आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा अनेक वर्षांपासून होते आहे. नवरात्रोत्सवात विजयादशमी ला व्यसन दहन असो किंवा नगरभोजन असो आश्रम व आश्रमाचे मठाधिपती द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर हे सतत सेवेत सादर आहेत.
दरम्यान च्या काळात माहूर दर्शनासाठी येणारे भाविक तसेच कर्तव्यावर असणारे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी व जो येईल त्याला दत्तप्रसादाचा लाभ हा या आश्रमाकडून देण्यात येत आहे. आजचा तरुण झपाट्याने व्यसनात गुरफटत चालला आहे.जे पुढील काळासाठी अंध:कारमय आहे.”बुडते हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येतसे” या उक्तीनुसार द.भ.प.साईनाथ महाराज यांनी समाज जागृतीचा वसा आपल्या शिरी घेतला आहे.भक्तीतून समृद्ध जीवनाकडे मानव जावा यासाठी आजवर अनेक उपक्रम श्री.आनंद दत्त धाम आश्रमाकडून घेण्यात आले आहेत.
आनंद दत्त धाम आश्रमाकडून आजपर्यंत अनेक विधायक उपक्रम माहूर नगरीत राबविण्यात आले आहेत. त्यात कोव्हिड काळात चालवलेले अन्नछत्र, दररोज हाॅस्पिटल ला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरवणे, गरजूंना धान्य वाटप,लसीकरण, शिक्षण परिषद घेणे,शिष्यवृत्ती मार्गदर्शन, वृक्षारोपण, स्वच्छतेबाबत जनजागृती,साहित्य संमेलन आयोजित करणे तसेच कीर्तन-भजनाच्या माध्यमातून समाजजागृती असे विविध उपक्रम साईनाथ महाराज वसमतकर यांनी राबवले आहेत.
त्याचबरोबर आटारी वाघा सिमेवर सैनिकांसाठी भक्ती व दत्त नामाचा महिमा कळावा यासाठी दत्त नाम सप्ताहाचे आयोजन व त्या माध्यमातून स्वच्छता,वृक्षारोपण. मानवतेचा संदेश त्यांनी दिला.विशेष म्हणजे अधिक मासात महिनाभर चुलबंद स्वादिष्ट नगर भोजन हे माहूरकर विसरणार नाहीत. या नवरात्रोत्सवात अन्नदानासाठी आश्रमाचे प्रवक्ते भाऊराव पाटील हडसणीकर, एस. एस. पाटील, बालाजी जाधव, सुधीर जाधव, हे विशेष परिश्रम घेत आहेत.