नांदेड| पालकांनी बाळाच्या आरोग्याप्रती सजग असले पाहिजे. जन्मानंतर अल्पावधीत जर अपंगत्वाचे निदान झाले तर तज्ज्ञांच्या मदतीने त्यावर उपचार करून त्यावर मात करता येते असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासन नांदेड ,समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड, आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल पंधरवडा 2024 निमित्त एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा अंतर्गत शहरातील श्री गुरुगोविंद सिंगजी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अभिजित राऊत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तालुका निहाय श्रवणदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ बोलत होते व्यासपीठावर उपजिल्हा चिकित्सक डॉक्टर संजय पेरके, तहसीलदार संजय वरकड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंत पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय बोराटे, दिव्यांग कक्ष प्रमुख कुरेलू, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक नितीन निर्मल आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना खल्लाळ म्हणाले की,अपंगत्व लपवून ठेवले तर समस्या वाढते व बालकांच्या आयुष्यभर परावलंबी जीवन पत्करावे लागते यासाठी बालकांच्या दिव्यांगत्वाचे शीघ्र निदान व त्यावर तत्काळ उपचार आवश्यक आहे. यावेळी डॉक्टर संजय पेरके यांनी आपल्या मनोगतात जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे 800 कॉक्लीअर इम्प्लांट ची शस्त्रक्रिया झाली असल्याचे सांगितले आहे.
या प्रसंगी प्रास्ताविकात मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी विकसित देशांमध्ये यूएनएचएस ही चाचणी सक्तीची आहे. परंतु ती भारतात केरळ वगळता नवजात बालकांसाठीच्या सक्तीच्या आरोग्य तपासणीच्या यादीत समाविष्ट नाही. तपासणी कार्यक्रम उपलब्ध नसल्यामुळे पालक मोठ्या काळासाठी भाषा, शिक्षण आणि अंदाज याद्वारे श्रवणदोष शोधण्यावर अवलंबून असतात. या विलंबामुळे मुलांना साधारण २४ महिन्यांचा सर्वांगीण विकासाचा कालावधी मिळत नाही. त्याउलट, यूएनएचएसची अंमलबजावणी होणाऱ्या देशांमध्ये सहा महिन्यांसारख्या अत्यंत कमी कालावधीत उपाययोजना करता येत असल्याची माहीती दिली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मुरलीधर गोडबोले यांनी मानले आहे.