नांदेड| नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद रेल्वे स्थानकास मराठवाडा मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत केल्याचे व तसा पत्रव्यवहार पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि प्रशासनाला केल्याचे मत डॉ. व्यंकटेश काब्दे (अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद) यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या मंचावरून प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जाहिर केले.
ते राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि स्व. बसवंतराव मुंडकर विचार मंच या सेवाभावी संस्थांच्या वतीने आयोजित पत्रकार पुरस्कार व पुस्तक प्रकाशन” कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे हे अध्यक्षस्थानी होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर हे होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला कार्यमर्यादा वाढवून त्यास सक्रीय करावे, जेणेकरून मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाकडून अधिक निधी मिळून विकासाला चालना मिळेल अशी मागणी यांनी यावेळी केली.
याप्रसंगी डॉ. मनोहर चासकर म्हणाले की, मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामात अनेक योद्धे लढले, त्यांचा त्याग, साहस त्यातील सर्वांचाच इतिहास मांडण्यात आला नाही. याबाबत महाविद्यालयानी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या साहाय्याने माहिती संकलीत करावी. त्यांचा समग्र ग्रंथ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रकाशित करेल याविषयीचे पत्र निर्गमीत करण्यात येईल. उपेक्षित किंवा माहिती नसलेल्या हुतात्म्यांच्या विषयीची मांडणी नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल. यावेळी पुरस्कार प्राप्त प्रतिनिधींचे मनोगत जेष्ठ पत्रकार संजिव कुलकर्णी यांनी केले. स्वातंत्र्य चळवळीतील सन्मानित कुटुंबियांचे प्रतिनिधींचे मत जेष्ठ नागरिक तात्यासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना राज्य मराठी पत्रकार परिषद नोंदणीकृत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी पूर्वीची पत्रकारिता व आताच्या पत्रकारितेपुढील आव्हाणे याबाबत सविस्तर मांडणी केली. मराठवाडा मुक्ती संग्रामातील उपेक्षित आणि अज्ञात चळवळी योद्ध्यांची माहिती संकलीत व प्रसारीत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादीत केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात पत्रकार संजिव कुलकर्णी आणि अनिल मादसवार यांचा सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला.
कुलगुरू आणि मान्यवरांच्या हस्ते चळवळीतील उपेक्षित बाप माणूस या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामातील लढवय्य यांच्या कुटुंबातील तात्या देशमुख, विनोद गंगाप्रसादजी अग्रवाल आणि भगिरथबाई मुंडकर, पुस्तकाच्या संपादिका सौ. ललिता बडे यासह प्रकाशक, मुद्रक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर तर संचालन डॉ. शिवदास हमंद यांनी केले.