हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात तुफान वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. त्यातच वरील पातळीवर मोठा पाऊस झाल्याने ते पाणी देखील पैनगंगा नदीपात्रात आला. यामुळे हिमायतनगर हदगाव – तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील पिके पाण्याखाली आल्याने शेतीतील सोयाबीन, कापूस यासारखी पिके उन्मळून गेली आहेत. या नुकसानीचे चित्र पाहून शेतकरी राजा हतबल झाला असून, यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी केली.
त्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर, डोल्हारी पैनगंगा नदीकाठच्या परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दिनांक ०६ सप्टेंबर रोजी आल्यानंतर गावातील सर्व नागरिक शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधताना बोलत होत्या. यावेळी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी सांगितले कि, मतदार संघातील बहुतांश भागाचा मी दौरा केला आहे, जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे नुकसान कधीही भरून निघणारे नाही. या पुराच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. झालेली अतिवृष्टी एवढी भंयक होती कि, अनेक शेतकऱ्यांची जनावरे देखील यात वाहून गेली तर बहुतांश नागरिकांची घर पडल्यामुळे संसार उघड्यावर आले आहेत. पुढील दोन वर्ष खरडून गेलेल्या जमिनीत पिकांना उभारी मिळणे कठीण असल्याचेही त्या म्हणाल्या.
आगामी सण उत्सवाचे दिवस लक्षात घेता शासनाने पंचनामे करण्यात वेळ वाया न घालवता हदगाव – हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर तात्काळ आर्थिक मदत जमा करून दिलासा द्यायला हवा असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत हिमायतनगर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या भागातील व्यथा सरकार दरबारी मांडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत देण्यासाठी शासनाने तात्काळ पाऊले उचलावीत, त्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व इतर वरिष्ठांना पूरग्रस्त भागाची परिस्थिती कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.