नांदेड| व्यसनाधिनतेमुळे ग्रामीण भागात पोहोचलेल्या कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात व्यसनमुक्त गाव मोहीम ही योजना राबविण्यात येत आहे. असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप केले.
ते दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील मौजे शिऊर, तालुका हदगाव येथून करण्यात आला यावेळी बोलत होते. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी, अहमदपूर तालुक्यातील मौजे खंडाळी तर गंगाखेड तालुक्यातील मौजे इसाद येथून अनुक्रमे लातूर व परभणी जिल्ह्यातील व्यसनमुक्त गांव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे.
सदर दोन्ही ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमास, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर, मौजे खंडाळी येथे झालेल्या कार्यक्रमास लातूरचे अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे तर मौजे इसाद येथे झालेल्या कार्यक्रमास परभणीचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीचे महत्त्व समजावून सांगत या कामी पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले.
व्यसनमुक्त गाव मोहिमेसाठी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, नांदेड परिक्षेत्रात असणाऱ्या चारही जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात येऊन, तंटामुक्त गांव समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, गावोगावी ग्रामरक्षक दल व दुर्गा व्यसनमुक्त गाव समित्या देखील तयार करण्यात आल्या आहेत. गांव पातळीवर तयार झालेल्या उपरोक्त समित्या दारू, गुटखा इत्यादी व्यसनांची साधने गावात पोहोचू न देण्यासाठी पोलिसांना मोलाची मदत करत आहेत.
मौजे खंडाळी व इसाद येथे झालेल्या कार्यक्रमात, ग्रामस्थांनी गावात अवैधरित्या दारू, गुटखा इत्यादी व्यसनांची साधने येऊ न देण्याचा निर्धार केला असून, सदर गावांतील ग्रामस्थ, स्थानिक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत. सदर प्रसंगी, मौजे इसाद येथे व्यसनमुक्त झालेल्या पाच ग्रामस्थांचा सत्कारही पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांचे हस्ते करण्यात आला. व्यसनाधीन झालेल्या तरुणांनी सदर सत्कारार्थींकडून प्रेरणा घेऊन जीवनात मार्गक्रमण करावे, असा संदेश यानिमित्ताने श्री उमाप यांनी उपस्थितांना दिला. सदर मोहिमेत सर्व गावांमधील ग्रामस्थांनी हिरीरीने सहभागी घेऊन आपले गांव व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.