नांदेड| युगपुरुष, राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारताचे प्रेरणास्थान आहेत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला गेलेला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 या दिवशी राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि ते ‘छत्रपती’ झाले.
याच दिवसापासून त्यांनी राजपत्रावर ‘क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती’ असे नामाभिधान सुरू केले आणि नवीन शक सुरू करत आपण युगप्रवर्तक शककर्ते आहोत, असे जाहीर केले. स्वराज्य-निर्मितीतील असंख्य महत्त्वाच्या घटनांपैकी भारताच्या इतिहासाला वळण देणारी आणि या भूमीत स्वातंत्र्याचा पहिला उद्घोष करणारी सर्वोच्च घटना म्हणजे, ‘शिवराज्याभिषेक’. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष असून, या निमित्ताने आम्ही शिवविचारांचा जागर मांडत आहोत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृतिशील समाजसेवक इंजी.शे.रा.पाटील तर प्रमुख वक्ते अनिल पवार, शिवराज्याभिषेक ग्रंथाचे संकलक अध्यक्ष सह्याद्री प्रतीस्थान मुळशी आणि चेतन कोळी, संपादक-प्रकाशक, पुणे यांचे शिवराज्याभिषेक ग्रंथाच्या निर्मितीचा प्रवास या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रम भूमिका सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नांदेड येथे रविवार ७ जुलै २०२४ सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या शिवजागर सोहळ्यात मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित व्हावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर नांदेड जिल्हा केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे यांनी केले आहे.