नांदेड (प्रतिनिधी) अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी सरकार विरोधात एकदिवसीय प्रचंड घोषणाबाजी करत असंख्य कार्यकर्त्यांसह भव्य जेल भरो आंदोलन करुन शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.


लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र या सामाजिक संघटने कडून मागील ३५ वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातून लाभवंचित जात समुहाना समान न्याय मिळण्यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे ही मागणी घेऊन राज्यात सर्वत्र आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार १९ सप्टेंबर रोजी महात्मा फुले पुतळा ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन पर्यंत पदयात्रा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले.


अनुसूचित जाती प्रवर्गाचे लोकसंख्येच्या प्रमाणात उपवर्गीकरण करण्यात यावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयातर्फे देण्यात आला होता त्यास दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण होऊनही, महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट या महायुतीने अद्यापही राज्य मंत्रिमंडळामध्ये उप वर्गीकरणाचे विधेयक मंजूर केलेले नाही.


त्यामुळे गेल्या एका वर्षापासून लाभवंचित जात समुहातर्फे लोकशाही मार्गाने विविध आंदोलने, महामोर्चा, पदयात्रा काढण्यात आले तसेच सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या सात सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता त्यांच्या निर्णयाविषयी अवमान करण्याचे काम सज्य सरकार करत आहे. म्हणून संघटनेच्या वतीने राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुकास्तरावर एकदिवसीय प्रचंड भव्य जेलभरो आंदोलन करण्यात आले.

नांदेड शहर व इतर तालुक्यातील संघटनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांच्या सोबतीने हे जेलभरो आंदोलन नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा ते शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे पदयात्रा काढण्यात आली. यावेळी असंख्य कार्यकर्ते जमा होऊन जेलभरो आंदोलन करुन शासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला व याचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना देण्यात आले.
यावेळी नांदेड जिल्ह्यातील असंख्य समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. जेलभरो आंदोलनसाठी प्रमुख मार्गदर्शन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भंराडे, जिल्हाध्यक्ष नागोराव कुडके, कैलास सूर्यवंशी, कॉम्रेड अंबादास भंडारे, शहराध्यक्ष सुनील जाधव, माधव गायकवाड, अशोक गायकवाड, श्रावण गायकवाड, रघुनाथ शिंदे, माणिक कांबळे, पिराजी गाडेकर, सुरेश मेटकर, शिवाजी गुंडले, गौतम गजभारे, दिगंबर दिवडे, दिलीप टोमके, अनिल गायकवाड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


