नांदेड| संत मीराबाई यांच्या भजन रचनेमध्ये प्रीती आणि भक्ती यांचा अलौकिक संगम असून, मध्ययुगीन काळातील त्या श्रेष्ठ संत आहेत. पाचशे वर्षानंतरही मीराबाईंची भजने गाताना स्वर्गसुख प्राप्त होते. असे गौरवोद्गार संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध भारुड गायिका चंदाताई तिवारी यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काढले.
विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलात संत मीराबाई यांच्या ५२५ व्या जयंतीच्या निमित्ताने संगीत नाटक अकादमी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत सुप्रसिद्ध भारुड गायिका चंदाताई तिवारी यांनी मार्गदर्शन केले. गायन, वादन, नृत्य आणि नाट्य यांच्या साह्याने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत संत मीराबाई यांच्या अभंगांशी एकजीव करत चंदाताई तिवारी यांनी प्रशिक्षण दिले. नृत्यांगना संध्या साखी, उमराव वागज, रामचंद्र सुतार यांनी त्यांची सोबत केली.
कार्यशाळेच्या समारोप सोहळ्याप्रसंगी ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक प्रो. डॉ. पृथ्वीराज तौर अध्यक्षस्थानी होते. चंदाताई तिवारी यांच्या समवेत सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. विश्वाधार देशमुख, भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. अविनाश कदम, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नरंगले, डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयीका डॉ. योगिनी सातारकर, नाट्यसमीक्षक डॉ. दुर्गेश रवंदे, संयोजक प्रा. किरण सावंत, डॉ. शिवराज शिंदे, संध्याताई साखी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यशाळेत ९५ विद्यार्थी सहभागी झाले होते. समारोप सोहळ्याप्रसंगी संध्या साखी आणि संकुलातील विद्यार्थीनी मीनाक्षी आडे यांनी संत मीराबाई यांच्या रचनांचे नृत्य सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवराज शिंदे यांनी केले तर शेवटी प्रा. प्रशांत बोंपिलवार यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. नामदेव बोंपिलवार, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. अभिजीत वाघमारे, प्रा. दीप्ती उबाळे, निशिकांत गायकवाड, गजानन हंबर्डे यांनी परिश्रम घेतले.
ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे विद्यार्थी नाट्य, चित्रपट, संगीत, नृत्य या कलाक्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहकार्यातून विद्यार्थ्यांसाठी विविध संसाधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी संकुलाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांकडून स्वयंस्फूर्तीने दशलक्ष रुपयांचा निधी उभा केला जात आहे. अशी माहिती संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी दिली.