नांदेड| जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3, एफएलबीआर-2, टि.डी-1 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.
जिल्ह्यात मतदानाचा पूर्वीचा दिवस शनिवार दिनांक 17 डिसेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र देशी दारू नियम, 1973 चे नियम 26 (1) (सी) (2) व मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या ) नियमावली, 1969 चे नियम 9 ए (2) (सी) (2) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.