हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातून उमरखेड, ढाणकी, बोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जीवघेण्या नडव्याच्या पुलाचे काम कधी..? होणार असा प्रश्न वाहनधारक नागरिकांसह आता गणेशभक्तातून विचारला जात आहे. आतापर्यंत चार ते पाच वेळा हा पुल मंजूर झाला असल्याचे सांगून नेते मंडळींनी नागरिक वाहनधारकाच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचे काम केले कि काय..? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. आता चार दिवसावर गणपती बापाचे विसर्जन येऊन ठेपले आहे. त्यामुळे या नडव्याच्या पुलातून गणपती बाप्पाला नेताना विसर्जन मिरवणुकीला अडथळा येऊन काही अनुचित घटना घडल्यास राजकीय नेत्यांसह याकडे दुर्लक्ष करणारे बांधकाम खाते व संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल अशी संतापजनक भावना नागरिक, गणेशभक्तातून बोलून दाखविली जात आहे.
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच उमरखेड बोरी मार्गावर पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती वरद विनायकाचे मंदिर आहे. गणेश चतुर्थी, अंगारिका चतुर्थी, गणेशोत्सवाच्या पर्वकाळासह दररोज हजारो भाविक भक्त इच्छापूर्ती वरद विनायक गणपतीच्या दर्शनासाठी ये-जा करतात. याचं गणेश मंदिराच्या ठिकाणी असलेल्या विहिरीत गणेशोत्सवाच्या शेवटी ११ दिवस उत्सव साजरा केलेल्या भक्ताकडून अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन करून पुढचं वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण दिले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षपासून या विसर्जन मिरवणूक रस्त्यावरील नडव्याच्या पुलाचे काम काही केल्या मार्गी लागत नसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याने पळसपूर, डोल्हारी मार्गे ढाणकी, उमरखेड, माहूर आणि बोरी मार्गे उमरखेड, यवतमाळ, वाशीम, दिग्रस अश्या दूरवरच्या गावांना व तीर्थस्थळांना याच पालखी मार्ग रस्त्याच्या रखडलेल्या पुलावरऔन नागरिकांना जावं लागत आहे.
हिमायतनगर शहराला लागून नडव्याचा नाला म्हणून ३० वर्षाखाली झालेला पूल आहे. त्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, थोडासा जरी पाऊस झाला तर पुलावरून पाणी वाहून तासंतास वाहतूक बंद होत असते. त्यामुळे विदर्भ – मराठवाडा संपर्क तर तुटतोच पुढील भागाकडे शेतकऱ्यांना अडकून पडावे लागते. त्याचबरोबर इच्छापूर्ती वरद विनायकाच्या दर्शनाला जाता येत नाही. पुढे दोन ते तीन शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जात येत नसल्याने शैक्षणिक नुकसान होते आहे. त्यामुळे हा पूल करून वारंवार होणारी अडचण दूर करावी अशी मागणी केली जात आहे. पुलाची मागणी झाली कि राजकीय नेते हा पूल मंजूर झालेला आहे.. लवकरच पूर्ण होईल असे सांगून गेल्या पाच वर्षपासून नागरिक, गणेशभक्तांच्या कोपराला गूळ लावण्याचे काम करत आहेत. मात्र अद्यापही हा पूल झाला नसल्याने गणेशभक्त नागरिक, शेतकरी व पुढील गावाकडे व तीर्थस्थळांना जाणाऱ्या भाविकांसह लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नुतकेच शहरातून नडव्याच्या नाल्यापर्यंतचा सिमेंट काँक्रेटचा रस्ता झाला असून, यामुळे पूल आणखीनच खोल म्हणजे जवळपास ७ ते ८ फूट खोलवर गेला आहे. तसेच रस्त्याच्या बाजून बांधण्यात आलेल्या नाल्याची रुंदी कमी झाल्याने मोठा पाऊस झाला कि अनेकांच्या घरात पाणी शिरून रात्र जागून काढावी लागत आहे. या नडव्याच्या नाल्याचे काम मार्गी लागत नसल्याने दुचाकीसह ट्रैक्टर, स्कुलबस, ऑटो, मोठे ट्रक, बैलगाडी आदींना ये-जा करताना जीव धोक्यात घालून वाहन चालवले लागत आहेत. सिमेंट काँक्रेट रत्स्यावरून उतरून पूल करून पुन्हा पुढील रस्ता चढताना आणि पुढील रस्ता उतरून शहराकडे सिमेंट काँक्रेट रत्स्यावर वाहन आणताना वाहन पलटी होण्याचा धोका वाढला आहे. नुकतेच छोटे मोठे वाहन उलटून अनेक जण जखमी होण्याचे प्रकार चालूच आहेत. असे अपघाताचे प्रकार केवळ नडव्याच्या नाल्याचा पूल झाला नसल्याने होऊ लागले असल्याचे नागरिक वाहनधारक बोलून दाखवीत आहेत.
आत्तातर गणेश उत्सव विसर्जनाचे दिवस जवळ येऊ लागले आहेत. हिमायतनगर शहरात बहुतांश गणेश मुर्त्या १५ ते २० फूट उंचीच्या असून, शहरात जवळपास ३० मुर्त्यांची स्थापना झालेली आहे. विसर्जनाच्या दिवशी गणेश मिरवणूक निघताना ट्रैक्टरवर मुर्त्या ठेऊन शहरातील मुख्य रत्स्याने जातात. आणि विसर्जनासाठी या मुर्त्यां घेऊन वाहनांना बोरी/ उमरखेड रस्त्यावरील श्री कनकेश्वर तलावाच्या ठिकाणच्या विहिरीत विसर्जनासाठी घेऊन जावी लागतात. मात्र नडव्याच्या पूल झालेला नसल्याने सिमेंट रस्ता ते डांबरी रस्त्याच्या मधील नडव्याचा पुलाची उंची कमी असल्याने ७ ते ८ फूट खोल पूल झाल्याने मूर्ती विराजमान असलेले ट्रैक्टर आणि इतर वाहने येथून घेऊन जाणे अत्यंत जिकरीचे आहे. गणेश मूर्ती नेताना ट्रैक्टरच हेड खाली व ट्रॉली उंचावरून होऊन मूर्तीचा तोल जाऊन एखादी अनुचित घटना घडल्यास जवाबाबदार कोण..? असा प्रश्न आता गणेश भक्तातून विचारला जात आहे.
राजकीय नेते आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी व चमकोगिरी करून आपला पगडा मजबूत ठेवण्यासाठी फक्त घोषणाबाजी करतात. प्रत्यक्षात काम करण्याकडे मात्र दुर्लक्ष होते, पूल मंजूर झाला हणून गेल्या अनेक वर्षपासून सांगत असताना का..? करण्यात आला नाही असा प्रश्नही समोर येऊ लागला आहे. बोटावर मोजण्याइतकी काही कामे झाली तरी ती देखील निकृष्ट व बोगस होत असताना त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. परिणामी हिमायतनगर तालुक्यात विकासाचा बट्याबोळ झाला असून, मंजूर कामातून ठेकेदार, कार्यकर्ते, गुत्तेदारचं मोठे झाले असल्याचे पाहावयास मीळते आहे. एकूणच सामाजिक व जिव्हाळ्याच्या कार्यात राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष यास कारणीभूत ठरत आहेत.